दहीहंडीच्या वर्गणीवरून वाद ; दुचाकी जाळली

0

500 रुपये वर्गणी न दिल्याचा रागातून केले कृत्य : चौघांना अटक

पुणे : पुण्यामध्ये दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करत एका 24 वर्षीय दुकानदाराची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाने दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. दत्ता विजय शिंदे, ओमकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवळे अशी त्यांची नावे आहेत.

आंबेगाव खुर्द येथील पृथ्वीराज अपार्टमेंटमध्ये प्रफुल थोरात राहतात. त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. शिंदे, कांबळे, कदम आणि अहिवळे या चौघांनी प्रफुल यांच्याकडे दहीहंडीसाठी 500 रुपये वर्गणी मागितली. या वर्गणीवरून त्यांच्यामध्ये वाद झाला. वर्गणी न दिल्याने रागावून त्या चौघांनी शनिवारी मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमधली थोरात यांची मोटारसायकल पेटवून दिली. या आगीत मोटारसायकलबरोबरच इमारतींच्या स्लॅबलाही आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, सहायक पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक खानविलकर, सहायक फौजदार शिंदे, फडतरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने शोध घेऊन या चौघांना अटक केली.

वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास कारवाई

नागरिकांनी दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहात साजरे करावे. मात्र, ते करताना कोणीही वर्गणीसाठी नागरिकांवर जबरदस्ती करू नये. जर असे कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे. हडपसर येथे वर्गणी मागण्यावरून नुकताच गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्तांनी हा इशारा दिला आहे. असे असतानाही शहरात वर्गणीसाठी जबरदस्ती केल्याच्या घटना घडत आहेत.