यापुढे विषय समिती सभांना गैरहजर राहिल्यास कारवाई
पिंपरी-चिंचवड : महापालिकेची सर्वसाधारण सभा तसेच विषय समिती सभेला विनापरवानगी गैरहजर राहणार्या विभागप्रमुखांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. यापुढे विषय समिती सभांना विनापरवानगी दांडी मारल्यास कठोर कारवाई करू, अशी तंबी आयुक्तांनी दिली आहे. महापालिका सर्वसाधारण सभेसह स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला बाल कल्याण समिती आणि क्रीडा समिती या विषय समिती सभांना विभागप्रमुख तसेच प्रमुख अधिकार्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परंतु, अनेक विभागप्रमुख विनापरवानगी सभांना दांडी मारत होते. ही बाब आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कारवाईची तंबी दिली आहे.
नगरसेवकांच्या तक्रारींची दखल
विशेषत: महासभा, स्थायी समिती सभा आणि विधी समिती सभेला नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचे आदेश 2012 मध्ये सर्व अधिकार्यांना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या होते. या आदेशाचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या. अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत, माहिती देत नाहीत, काही अधिकारी तर दांड्या मारतात, अशी तक्रारी नगरसेवकांनी केल्या. त्याची दखल आयुक्तांनी घेतली.
तक्रारींमध्ये आढळले तथ्य
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगरसेवकांच्या तक्रारींची शहानिशा केली असता त्यात तथ्य आढळले. आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेताच काही अधिकारी दांडी मारत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. अखेर, सोमवारी आयुक्तांनीच ’अत्यंत महत्त्वाचे’ पत्रक जारी केले. त्यात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.