दाऊदचे केंद्राशी सेटिंग; निवडणुका जिंकण्यासाठीच भारतात आणणार!

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा लोकसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी तयारीला लागले असून, दाऊदला भारतात परत आणून निवडणूक जिंकण्याचा डाव आखला जात आहे. मात्र यात मोदींचे कर्तृत्व नसून अनेक दुखण्यांनी त्रासलेला दाऊदच स्वत: केंद्र सरकारशी सेटिंग करत असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. देशातील जनतेला लुभावण्यासाठी पंतप्रधान मोदी अधूनमधून काही इव्हेंट्स करत असतात. आधी स्वच्छ भारत, मग नोटाबंदी पण या दोन्ही योजना फसल्या आहेत. मग गुजरातच्या निवडणुकांआधी तिथल्या जनतेला भुलवण्यासाठी बुलेट ट्रेनचे भूमिपूजन या गोष्टी करून झाल्या आहेत. त्यामुळे आता नवीन आणखी काही तरी इव्हेंट शोधतील. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी दाऊदची खेळी करण्याचे ठरवले असल्याची माहिती आपल्याला कळाली आहे, असा गौप्यस्फोटही राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरेंच्या फेसबुक पेजचे लॉन्चिंग
राज्याच्या राजकारणात काहीसे भरकटलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन पुन्हा रुळावर आणून जनमानसांत मनसेची प्रतिमा बदलण्यासाठी राज ठाकरे यांनी फेसबुकचा आधार घेतला आहे. जनसंपर्क वाढवण्याची गरज ओळखून त्यांनी गुरुवारी सोशल मीडियावर पहिले पाऊल टाकले. राज यांच्या अधिकृत फेसबुक पेजच्या लॉन्चिंगचा मनसेने सोहळा केला. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज यांनी भाजपचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. राज म्हणाले, सोशल मीडियाच्या आधारावर मोदी केंद्रात आले. मात्र आता तोच सोशल मीडिया भाजपच्या अंगाशी येऊ लागल्याने त्याच्यावर विश्वास ठेऊ नका, अशी भाषा अमित शहा करत आहेत. मोदींच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटमधील 48 टक्के अकाऊंट फेक आहेत, असे संबंधित कंपन्यांनीच जाहीर केले आहे. तेव्हा खोटं किती काळ टिकणार? असा सवाल राज यांनी यावेळी केला.

नोटांचा फक्त रंग बदलला?
नोटाबंदीचा मोठा गाजावाजा केला गेला, पण 99 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मग काळा पैसा गेला कुठे? नोटाबंदीचा फायदा काय झाला? फक्त नोटांचा रंग बदलला, अशी टीकाही राज यांनी वेळी केली. आधीचे सरकार नुसते भाषणं करायचे आताचेही भाषणंच करतात. मग यामध्ये फरक काय आहे? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थितांना केला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे, असे मी एका प्रेमापोटी, आदरापोटी बोललो होतो. पण, मुंबई-महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केलात, तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालू, तेल लावत गेलं आधी काय बोललो होतो ते, असा इशाराही राज यांनी भाजपला – मोदींना दिला.