दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात हजेरी लावऱ्यांची चौकशी करा

0

मुंबई – कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीमच्या जवळच्या नातेवाईच्या लग्न समारंभाला राज्याचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन आणि भारतीय जनता पार्टीचे तीन-तीन आमदार उपस्थित राहणे हे अतिशय धक्कादायक असून या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत केली.

ज्या लग्न समारोहाला भाजपाचे नेते उपस्थित राहिले ते दाऊद इब्राहीमच्या अत्यंत जवळच्या नात्यातील आहेत. या लग्न समारोहाला उपस्थित राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केली असून याचबरोबर (इन्टलिजन्स ब्युरो) आयबीचीही चौकशी सुरू असल्याचे समजते. दाऊदचे हे नातेवाईक बेटींगच्या व्यवसायात अग्रगण्य असून या समारोहाला अंडरवर्ल्डमधले अनेक गुंड, बुकी, उपस्थित होते असा संशय आहे. राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यांना व पालकमंत्र्यांना यांची माहिती नसणे ही शक्यता कमी आहे. त्याचबरोबर स्थानिक भाजपा आमदारांना तरी याची माहिती निश्चित असावी असे सांगता येईल. त्यामुळे दाऊदच्या परिवाराशी आणि त्याच्याशी संबंधित कारवायांशी भाजपा नेत्यांचा काय संबंध आहे, हे स्पष्ट होणे नितांत आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

याअगोदर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर दाऊदशी फोनवर संभाषण झाल्याचे आरोप झाले होते. त्यांचा राजीनामा घेण्यामागे असलेल्या अनेक कारणांमागे हेही एक कारण होते. त्यामुळे एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने गिरीश महाजन यांना दुसरा न्याय असे होता कामा नये. महाजन यांच्यावरील संशय दूर होईपर्यंत त्यांनाही मंत्रिमंडळाबाहेर ठेवावे, अशी मागणीही सावंत यांनी केली.