दाऊद इब्राहिम मरणासन्न! आयएसआयची पाकमध्ये तारांबळ

0

मुंबई : कराचीत वास्तव्य करून भारतात माफ़िया टोळी चालवणार्‍या दाऊद इब्राहिमच्या आजारपणाने पाक सरकारला चिंतेत टाकले आहे. कारण भारतात घातपात व हिंसा माजवण्यासाठी पाठवल्या जाणार्‍या जिहादींना मोठी मदत याच टोळीकडून होत राहिली. दाऊद मेल्यास त्याच्या टोळीत फ़ाटा़फूट होईल आणि भारतातील त्याच्या साथीदारांना नियंत्रित करण्याचे कुठलेही साधन हाती राहणार नाही, अशी पाकची चिंता आहे.

विविध आजारांनी ग्रासलेल्या दाऊदला पक्षाघात वा हृदयविकाराचा झटका आल्याने इस्पितळात न्यावे लागले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊनही उपयोग झाला नाही. त्याला व्हेन्टिलेटरवर ठेवले असल्याच्या बातम्या आहेत. पाकने त्याचा कुठेही इन्कार केला नसला तरी दाऊदचा निकटवर्ती मानल्या जाणार्‍या छोटा शकीलने बातम्या अफ़वा असल्याचा दावा केला आहे. पण दाऊदच्या मुंबईतील घरी नातलगांनी गर्दी केल्याने बातमी खरी मानली जात आहे.

दाऊदच्या प्रकृतीपेक्षाही पाकला त्याच्या टोळीची चिंता आहे. दीर्घकाळ त्याच टोळीच्या हस्तकांमा़र्फत पाकने भारतात उत्पात घडवण्याचे उद्योग केले आहेत. दाऊद मरण पावल्याचे कळले तर टोळीतील अनेकजण कब्जा मिळवण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठतील. त्यात दाऊद कंपनी उद्ध्वस्त होऊन जाईल, अशी ही चिंता आहे. कारण अजून तरी दाऊदला पर्याय होऊ शकेल, असा कोणी प्रभावी भारतीय हस्तक पाकला मिळू शकलेला नाही. साहजिकच दाऊद मेल्याची बातमी गुलदस्त्यात ठेवून, त्याची टोळी टिकवण्याची कसरत पाक गुप्तचर खाते करू बघत आहे. त्यामुळेच शकील व अन्य प्रमुख साथीदारांना बातम्या खोट्या पाडण्याच्या कामी पाक गुप्तचर संस्थेने जुंपले असल्याचे जाणकार मानतात.