दाऊद कराचीत असेल, भारताला मदत का करावी

0

भारतात मुस्लिमांवर हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात दाऊद करतोय भारतावर हल्ले!

लाहोर । मुंबई बॉम्बस्फोटाचा सुत्रधार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम कराचीतच लपून बसल्याचे संकेत पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी दिले आहेत. दाऊद इथेच कुठे कराचीत असेलही, पण आम्ही भारताला का म्हणून मदत करावी? असा उरफाटा सवाल मुशर्रफ यांनी केला आहे. दरम्यान, लादेन अबोटाबादमध्ये पाच वर्षांपासून राहत होता या दाव्यावर मलादेखील शंका असल्याचे ते म्हणाले.

परवेज मुशर्रफ यांचा उरफाटा सवाल
पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी हा सवाल केला. बर्‍याच काळापासून भारत पाकिस्तानवर आरोप करत आला आहे. मग आता आम्ही भारताला मदत का करावी?, असा सवाल करतानाच दाऊद नेमका कुठं आहे, हे मला माहित नाही. पण तो इथेच कुठं कराचीत असावा. भारतात मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून दाऊद भारतावर हल्ले करत आहे, असं त्यांनी सांगितलं.

लादेनविषयी माहिती नव्हती
पाकिस्तानने अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनच्या वेळीही तो पाकिस्तानात नसल्याचा कांगावा केला होता. मात्र पाकमधील अबोटाबादमध्ये तो लपून बसला होता हे अमेरिकेच्या कारवाईनंतर स्पष्ट झालं. याकडे मुशर्रफ यांचे लक्ष वेधण्यात आले असता ते म्हणाले, गुप्तचर यंत्रणेला ओसामा बिन लादेनविषयी माहिती नव्हती. अबोटाबादमध्ये राहणारा व्यक्ती ओसामा होता याची माहिती कोणालाही नव्हती.