दाऊद गँगने जामनेरसह पहूरमधूनही चोरली वाहने

नांदेडसह हिंगोलीतून चोरलेल्या स्वीप्ट जप्त : अकोला, वाशिम, जालना, हिंगोली, नांदेड ग्रामीण, औरंगाबादमध्ये वाहने चोरल्याची कबुली : पथक परराज्यात जावून विकलेली वाहने जप्त करणार

जळगाव : राज्यभरात चारचाकी चोरी करून धुमाकूळ घालणारी अट्टल दाऊद गँग जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली असून संशयीतानी अकोला, वाशिम, जालना, हिंगोली, नांदेड ग्रामीण, औरंगाबादमध्ये वाहने चोरल्याची कबुली आरोपींनी दिली तर त्यांच्या ताब्यातून नांदेड व हिंगोलीहून आरोपींनी चोरलेल्या दोन स्वीप्ट कार जप्त करण्यात आल्या. संशयीतांनी जामनेरसह पहूर येथेही गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. शेख झिशान शेख दाऊद (27, रा.धाड करडी, ता.जि. बुलढाणा) व शेख सद्दाम शेख मनु (25, रा.घाटनांद्रा, ता.जि. बुलढाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींनी परराज्यात वाहने विकल्याने त्याबाबत तपास करण्यासाठी लवकरच पथक परराज्यात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वात एएसआय अशोक महाजन, एएसआय शरीफोद्दीन काझी, हवालदार वसंत लिंगायत, नाईक युनूस शेख, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक कृष्णा देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल उमेशगिरी गोसावी, चालक पोलीस नाईक मुरलीधर बारी, चालक नाईक अशोक पाटील आदींनी ही कारवाई केली.

आणखी काही गाड्या जप्तीची शक्यता
अटकेतील आरोपी हे अट्टल असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागावर पथक होते. आरोपींनी जामनेर पोलिसांकडे गुन्ह्याच्या तपासार्थ ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी अन्य राज्यात वाहनांची विल्हेवाट लावल्याने लवकरच ही वाहनेदेखील जप्त होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली.