दाऊद पाकिस्तानातच!

0

मुंबई / नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार व 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानातच असून, फोन टॅपिंगच्या भीतीने व आपला सुगावा लागेल या शक्यतेने तो कुटुंबीयांना फोनही करत नाही, अशी माहिती दाऊचा भाऊ इकबाल कासकर याने दिली. इकबाल याला मुंबई पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर पोलिस, गुप्तचर यंत्रणा आयबी त्याची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीवेळी त्याने ही माहिती दिली. खंडणीच्या गुन्ह्यात इकबालला मंगळवारी अटक केल्यानंतर गुन्हे शाखा, गुप्तचर यंत्रणा त्याची सखोल चौकशी करत असून, त्यातून अनेक महत्वपूर्ण माहिती हाती आली आहे. त्यादृष्टीने दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकार पुढील रणनीती आखत आहेत.

राज ठाकरेंच्या गौप्यस्फोटांत तथ्य?
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानातच असल्याचे इकबाल कासकरने सांगितले आहे. दाऊदचे नातेवाईक आणि त्याची माणसे भारतात आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्यासही तो टाळाटाळ करत असल्याचे इकबाल म्हणाला. कारण, त्यातून त्याचे फोन टॅप होईल आणि त्याचा सुगावा लागून भारतीय गुप्तहेर यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचेल, अशी भीती दाऊदला सतावत असल्याचेही त्याने सांगितले. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्याने पाकिस्तानमध्ये चारवेळा घर बदलल्याची माहितीही इकबालने चौकशी अधिकार्‍यांना दिली होती. गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दाऊदला भारतात परत यायचे असून, तो मोदी सरकारशी वाटाघाटी करत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तसेच, दाऊदला भारतात आणून 2019च्या निवडणुका भाजपला जिंकायच्या आहेत, असेही ठाकरे म्हणाले होते. राज यांच्या या गौप्यस्फोटाने भाजप अडचणीत आला असून, त्यांनी अद्यापही त्यावर प्रत्युत्तर दिलेले नाही. त्यातच इकबाल कासकरच्या चौकशीचे वृत्त पाहाता, राज ठाकरेंच्या गौप्यस्फोटात तथ्य असल्याचे निदर्शनास येत आहे.

अमलीपदार्थ तस्करीचा व्यापार वाढविला
इकबाल कासकरने तपास यंत्रणांना सांगितले, की आपले दाऊदशी फारसे बोलणे होत नसले तरी दुसरा भाऊ अनीस इब्राहीम याच्यासोबत मात्र बोलणे होते. तोदेखील दाऊद याच्यासोबतच पाकिस्तानमध्ये असतो. इकबालच्या माहितीतून मुंबईत असलेले दाऊदचे नेटवर्क उघडकीस आणण्याचा प्रयत्नही पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचा अमलीपदार्थांच्या तस्करीचा व्यापार आफ्रिकेसह दक्षिण अमेरिकेतदेखील पसरला असून, मुंबईतील बांधकाम उद्योगातील कामकाज इकबाल हा पाहात आहे. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितल्यानुसार, खंडणीप्रकरणी एक पथक बिहारमध्ये पाठविण्यात आले असून, बिहारमधूनच काही शार्पशूटरस बोलविले जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. खंडणी रॅकेटचा पर्दाफाश करून दाऊदचे कंबरडे मोडण्याचा पोलिसांचा इरादा असल्याचेही पोलिसांनी सांगितले.