अनिस इब्राहीममुळे वाद, गुप्तचर संघटनेची माहिती
मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टर माइंड आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि त्याचा सर्वांत जवळचा सहकारी छोटा शकील वेगळे झाल्याचे वृत्त गुप्तचर संस्थेने दिले आहे. दाऊद आणि शकीलमध्ये दाऊदचा लहान भाऊ अनिस इब्राहिममुळे वाद झाला असल्याचे सांगण्यात येते. अनिस इब्राहीमचा डी कंपनीमध्ये वाढता हस्तक्षेप छोटा शकीलला खटकल्यानेच दाऊद आणि शकीलमध्ये अंतर निर्माण झाले. ज्या ठिकाणी शकीलचे वर्चस्व आहे, अशा कामांमध्ये अनिसचा हस्तक्षेप वाढत होता. यामुळेच दाऊद आणि शकील यांच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीत अडथळा निर्माण झाल्याचे गुप्तचर संस्थेच्या नव्या अहवालात म्हटले आहे. दाऊद आणि छोटा शकील यांच्यात फूट पडल्याच्या बातमीमुळे गँगमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कोणाचा आदेश मानायचा याबद्दल संभ्रम निर्माण झाला असल्याचेही गुप्तचर संस्थेने म्हटले आहे.
अनिस इब्राहीमला हवे डी कंपनीवर वर्चस्व
शकीलला दाऊदचा सर्वांत जवळचा आणि विश्वासू समजला जातो. डी कंपनीच्या अनेक मोहिमांचा सूत्रधार शकीलच असायचा. खंडणी, पायरसी यांसारख्या अवैद्य धंद्यांचा त्यामध्ये समावेश आहे. छोटा शकीलचे खरे नाव शकील शेख असून, तो दाऊदच्या डी कंपनीचा कारभार पाहत होता. अनिस कंपनीच्या कामामध्ये ढवळाढवळ करत असल्याचे आणि तो कंपनीची सूत्रे हातात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. अनिसने शकीलच्या व्यवसायात केलेल्या हस्तक्षेपामुळे या दोघांच्यात वादाला सुरुवात झाल्याचे समजते. शकील चित्रपट व्यवसाय आणि खंडणीच्या धंद्यांवर लक्ष ठेवायचा. पण, अनिसने चित्रपट व्यवसायात लक्ष घातल्याने त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. दाऊदच्या भावाने डी कंपनीच्या नेहमीच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली आणि कंपनीसाठीचे निर्णयदेखील तो घेऊ लागल्याचे या अहवालात म्हटले आहे. गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, भारतातून पळून गेल्यानंतर दाऊद आणि शकील दोघेही कराचीमध्ये राहत होते. मात्र, आता अनिसमुळे ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. शकील आता कोठे राहतो याची माहिती कोणालीही नाही.