दाखला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

0

उल्हासनगर । अंबरनाथमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील नागरिकांची संख्या लक्षणीय असून गेल्या 7 दशकांपासून ते येथे वास्तव्यास आहेत. गेल्या काही वर्षांपासून शासनाने लावलेल्या जाचक अटींमुळे या समाजाला जातीचे दाखले मिळवणे अवघड झाले होते. याची गंभीर दखल घेत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी राज पारधी समाजाला जातीचा दाखला मिळण्याकरीता मागणी विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे लावून धरली होती. त्याअनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज पारधी समाजाला जातीचे दाखले मिळण्यात येणार्‍या सर्व अडचणी दूर करण्याचे आश्‍वासन शिंदे यांनी आमदार डॉ. किणीकर यांना दिले असून राज पारधी समाजाला जातीचे दाखले मिळण्याकरीता पुढील आठवड्यात तहसील कार्यालयामार्फत शिबीर आयोजित करण्याच्या सूचना संबंधितांना या बैठकीत दिल्या. या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांपासून राज पारधी समाजाला ज्या सोयी सुविधांपासून दूर रहावे लागत होते, त्या आता त्यांना मिळू शकतील व त्यामुळे त्यांचे उज्वल भवितव्य घडू शकेल अशी भावना आमदार डॉ किणीकर यांनी यावेळी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला वि.जा.भ.जा. विभागाचे सचिव जे.पी. गुप्ता, सहसचिव भा.र.गावित, सहसंचालक भीमराव खंगणे, अंबरनाथ तहसिलदार प्रशांत जोशी, शिक्षक सेनेचे ज्ञानेश्‍वर म्हात्रे तसेच अंबरनाथ राज पारधी समाजाचे अध्यक्ष रामसिंग राजपूत व मोठ्या प्रमाणावर राज पारधी समाज व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. शैक्षणिक सुविधांसाठी व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचे दाखले आवश्यक आहेत. परंतु ते मिळविण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत अनेक जाचक अटी त्यांच्यावर लादल्या होत्या.