भुसावळ । सरकारी काम अन् बारा महिने थांब या म्हणीप्रमाणे कुठलेही शासकीय कागदपत्रासाठी नागरिकांना सहसा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र दिसते, मात्र हे चित्र बदलण्यासाठी येथील तहसिल प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडियाच्या उपक्रमास चालना देण्याच्या दृष्टीने पाऊले टाकले असून सरकारी तसेच शैक्षणिक कामांसाठी लागणारे अधिवास, उत्पन्नाच्या दाखल्यांवर तहसिलदार आता डिजिटल स्वाक्षरी करणार आहेत. त्यामुळे सर्व दाखले ई-डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून अथवा आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना हे दाखले घरच्याघरी प्राप्त होणार आहेत.
घरबसल्या मिळणार दाखले
नागरिकांना घरबसल्या ई-पद्धतीने विविध प्रकारचे दाखले मिळावे तसेच दाखले वाटपातील वेळ कमी होऊन त्यात पारदर्शकता यावी शिवाय गैरप्रकाराला आळा घालता येणार आहे. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून काम सुरु होते. शालांत परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जातीचा दाखला, उत्पन्न, क्रिमिलेअर आणि अधिवास दाखला असे विविध दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात विद्यार्थी, पालकांची झुंबड उडते. थोड्या काळात हजारो अर्ज आल्याने प्रशासनाची दाखले देताना दमछाक होते. स्वाक्षरीसाठी अधिकारी उपलब्ध नसणे, अधिकार्यांकडे अर्ज प्रलंबित राहणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होतात. आता नागरिकांना विनातक्रार घरबसल्या अर्ज मिळावे यासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
तहसिलदारांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
यासंदर्भात तहसिलदार मिनाक्षी राठोड यांच्या दालनात शनिवार 1 रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या पर्वावर डिजीटल स्वाक्षरी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यापासूनच याची सुरवात होत आहे. याप्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, निवासी नायब तहसिलदार संजय तायडे, नायब तहसिलदार डी.पी. सपकाळे, पुरवठा विभागाचे राठोड उपस्थित होते.
ट्रॅकिंगद्वारे मिळणार माहिती
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्य नागरिकांना वारंवार लागणारे आणि महत्त्वाचे दाखले तातडीने देता यावेत म्हणून सरकारने डिजिटल पद्धत अस्तित्वात आणली आहे. तहसिल प्रशासनाच्या वतीने या पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये तीन डेस्कवर आलेल्या कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन पध्दतीने होऊन याची प्रत्येक प्रक्रियेची सुचना अर्जदारास मोबाईल संदेशाद्वारे मिळणार आहे. यासाठी अर्जदारास तहसिल कार्यालयाच्या चकरा मारण्याची आवश्यकता नसून दाखला तयार झाल्यास तात्काळ मॅसेज मिळणार आहे. तसेच बारकोड सिस्टीम असल्यामुळे कागदपत्रांची सत्यतेबाबत खात्री राहिल भविष्यात काही अडचण आल्यास लिंकद्वारेच दाखल्यासंबंधी सविस्तर माहिती अधिकार्यांना पाहता येऊ शकेल. त्यामुळे यात गैरप्रकार थांबतील.