दागिने चोरणार्‍या भामट्यास जिल्हापेठ पोलिसांनी घेतले ताब्यात

0

जळगाव। बसमध्ये चढत असतांना प्रवाश्याच्या खिशातून सोन्याचे दागिने ठेवलेली डबी चोरणार्‍या भामट्यास शनिवारी जिल्हा पेठ पोलिसांच्या डिबी पथकाने ताब्यात घेतले आहे. यातच चोरट्याने दागिने चोरी केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. तर चोरीला गेलेले सोन्याचे कानातल्या रिंगा चोरट्याने पोलिसांना काढून दिल्या आहेत. गेल्या एक ते दिड महिन्यापूर्वी नवीन बसस्थानकावर बसमध्ये चढत असतांना प्रवाश्याच्या खिशातून सोन्याचे दागिने ठेवलेली डबी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.

याबाबत प्रवाश्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यातील डिबी पथक चोरट्यांच्या शोधार्थ होते. यातच डिबी कर्मचारी अल्ताफ पठाण व नाना तायडे यांना संशयिताविरूध्द माहिती मिळाली असता त्यांनी शनिवारी कांचननगरात सापळा रचत संशयित रविंद्र उर्फ चिन्या जगताप यास ताब्यात घेतले. संशयितास पोलिस ठाण्यात नेवून खाक्या दाखविल्या असता त्याने चोरी केल्याची कबूली दिली असून काही दिवसांपूर्वीच मोबाईल चोरीत अटक करण्यात आलेल्या मोहन भारूळे याच्यासह चोरी केल्याची कबूलीही त्याने दिली आहे. चोरीला गेलेले सोन्याचे कानातले चोरट्याने पोलिसांना काढून दिले आहे.