कृऊबा व्यापार्यांच्या बंदला पाठींबा ; कृऊबाच्या नवीन संरक्षण भिंत बांधून देण्याच्या मागणीसाठी व्यापारी एकवटले
जळगाव : विकासकाने कृऊबाची संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन देवूनही नवीन भिंत बांधून न दिल्याने कृऊबातील व्यापार्यांनी बेमुदत बंदचे अस्त्र उगारले आहे. या आंदोलनाला दाणाबाजार व्यापारी असोसिएशनने तसेच व्यापार्यांनी एक दिवस दाणाबाजारातील दुकाने बंद ठेवून पाठींबा दिला आहे. यामुळे दाणाबाजारातील 10 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. कृऊबाच्या संरक्षक भिंतीसाठी व्यापारी एकवटले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्यांच्या बंदला पाठिंबा देत शुक्रवार, 21 जून रोजी दाणाबाजार असोसिएशनच्यावतीने एक दिवस बंद पाळून दाणाबाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला. बंद दरम्यान बाजार समिती व दाणाबाजारातील 200 व्यापार्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणला होता.
घोषणांनी परिसर दणाणला
मार्केट यार्ड आडत असोसिएशनने सोमवारपासून पुन्हा बंद पुकारून आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. या बंदच्या समर्थनार्थ दाणाबाजार असोसिएशनने पाठिंबा देत शुक्रवार, 21 रोजी दाणाबाजारातील सर्व दुकाने बंद ठेवली. शुक्रवार सकाळपासूनच दाणाबाजारातील व्यापाजयांनी आपली दुकाने बंद ठेवली. जवळपास 200 व्यापार्यांनी कडकडीत बंद पाळत मार्केट यार्ड आडत असोसिएशनला पाठिंबा दिला, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली. सोबतच बाजार समितीमधील व्यापाजयांनी दाणाबाजारात येऊन सर्वांना बंदचे आवाहनही केले. या वेळी दोन्ही असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांनी एकत्र येत ‘व्यापारी एकता जिंदाबाद…’, ‘व्यापार्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे….’ अशा घोषणा दिल्या.
बंदमुळे उलाढाल ठप्प
दाणाबाजारात मीठापासून ते सर्वच प्रकारच्या 1500 वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे या ठिकाणी दररोज जळगाव जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भातील व्यापारी मोठ्या संख्येने वाहने घेऊन खरेदीसाठी येत असतात. यातून जवळपास 10 कोटींची उलाढाल होते. मात्र शुक्रवारी बंदमुळे ही सर्व उलाढाल ठप्प झाली.
दोन दिवसांपूर्वी व्यापाजयांची बैठक होऊन बंदचा निर्णय घेण्यात आल्याने व तशी पूर्व सूचना देण्यात आल्याने जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून खरेदीसाठी येणारे व्यापारी आले नाहीत.