मुंबई । मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने मुंबईतील उड्डाणपुलाखालील ‘पे अँड पार्क’ योजना बंद केल्या नंतर आता दादर पुलाखालील चालवण्यात येणारे दादरचे एशियाड एसटी स्टँड बंद करण्याची नोटीस एसटी महामंडळाला पाठवली आहे. एसटी मंडळांला तोट्या बरोबरच कमी प्रवाश्यांची संख्या भेडसावत असताना आता एसटी स्टॅण्डच बंद करण्याची वेळ आली आहे. दादर-एशियाड स्टॅण्ड उड्डाणपुलाखाली असल्याने पालिकेच्या उपमुख्य इंजिनीअर (वाहतूक) यांनी नुकतेच एसटीच्या कुर्ला विभाग अधिकार्यांना पत्र पाठविले आहे. त्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत इथल्या स्टँडची जागा लगोलग निष्कासित करण्यास सांगितले आहे. या पत्राने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे. एसटी महामंडळाचा शिवनेरी सेवांमुळे उच्चभ्रू वर्गाचीही पसंती मिळालेल्या या स्टॅण्डच्या अस्तित्वावर पालिकेच्या या पत्रामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा स्टॅण्ड दादर टीटीकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाखाली आहे.