दादरमध्ये इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

0

मुंबई । दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी इमारतीचे पाडकाम सुरु असतानाच त्या इमारतीचा मजला रस्त्यावर उभ्या असलेल्या एका खाजगी टॅक्सीवर कोसळल्याने त्याखाली दबून चालक जागीच ठार झाला. टॅक्सी चालकाचे नाव अजूनही समजू शकलेले नाही. मात्र कोसळलेल्या मजल्याच्या ढिगा-याखाली टॅक्सी दबली गेल्याने त्यात बसलेले दोन प्रवासी बचावले असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला अग्निशमन दलाकडून दूजोरा मिळालेला नाही.

दादर पूर्वेला टी. टी. पुलाजवळ गोविंद मंगेश लाड रस्त्यालगत आणि एका खाजगी बँकेजवळील गल्ली क्रमांक दोनमध्ये ‘तेजल’ ही इमारत आहे. तळमजला अधिक तीन मजल्यांची ही इमारत मोडकळीस आल्यामुळे तिचे पुनर्बांधणीचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी ती पाडण्यात येत होती. पाडकाम सुरू असतानाच जेसीबी चालकाच्या चुकीमुळे इमारतीचा संपूर्ण मजलाच खाली कोसळला, . मजला कोसळला त्यावेळी तेथे ‘ओला’ या कंपनीची टॅक्सी उभी होती. कार ढिगा-याखाली दबली. यामध्ये कारमध्ये बसलेला चालक गंभीर जखमी झाला. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मातीचा ढिगारा हटवून चालकाला बाहेर काढले, मात्र तो बराच जखमी झाल्यामुळे त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारांसाठी नेले. पण तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्याचे नाव अद्याप समजलेले नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या अजून घटनास्थळी तैनात असून, ढिगा-याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे.