दादर येथे 43 वर्षांच्या व्यक्तीवर वार करणार्‍या आरोपीस अटक

0

मुंबई- सात दिवसांपूर्वी दादर येथे विनोद प्रकाश नाटेकर या पाणी व्यावसायिकावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन पळून गेलेल्या दोनपैकी एका मारेकर्‍याला पकडण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. विक्रम भुतेकर असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यांत अभिषेक गुप्ता नावाचा दुसरा आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. त्याच्याच सांगण्यावरुन विक्रमने हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. ही घटना 21 मार्चला रात्री साडेनऊ वाजता दादर येथील डी. एस बाबरेकर मार्गावरील मनसे शाखा क्रमांक 191 जवळ घडली. विनोद नाटेकर हे दादर येथील एस. के. भाले रोडवरील अन्नापूर्णा इमारतीमध्ये राहत असून ते पाणी व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. गेल्या मंगळवारी साडेनऊ वाजता ते मनसे शाखा क्रमांक 191 जवळ मोबाईलवर व्हिडीओ गेम खेळत होते. याच दरम्यान तिथे दोन तरुण आले. काही कळण्यापूर्वीच एकाने तिक्ष्ण हत्याराने त्यांच्या गालावर वार केले होते. त्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना स्थानिक रहिवाशांनी सुश्रृषा रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरुन दादर पोलिसांनी पळून गेलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असता त्यातील एक तरुण विक्रम असल्याचे उघडकीस आले. विक्रम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध काही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. चौकशीत त्याने अभिषेक घोसाळकर याच्या सांगण्यावरुन हा हल्ला केला होता. अभिषेक हा फरार असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.