’दादर सांस्कृतिक मंच’तर्फे फोटो वॉकचं आयोजन

0

मुंबई : दादरला मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार म्हटलं तरीही त्यात काही वावगं नाही ठरणार. हाच विचार करुन दादर सांस्कृतिक मंचाचर्फे हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. या वॉकसाठी तुमचा कॅमेरा रेडी ठेवा. दादर सांस्कृतिक मंचाद्वारे आयोजित हा फोटो वॉक 16 जुलैला म्हणजेच रविवारी आयोजित करण्यात आला आहे. ऐतिहासिक स्थळांचे फोटो काढण्याची संधी या उपक्रमाद्वारे मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. हेच फोटो दादरची ओळख म्हणून संग्रहित करण्यात येणार आहेत.

प्रभादेवी ते माहिम अशा फोटो वॉकमध्ये तुम्हाला ऐतिहासिक स्थळांपासून ते जुन्या इमारतींपर्यंत सर्वांची माहिती देण्यात येणार आहे. फक्त माहिती नाही, तर फोटोच्या माध्यमातून दादर अधोरेखित करण्यात येणार आहे.

दादरमधील ऐतिहासिक वारसा होणार अधोरेखित
या फोटो वॉकमध्ये शिवाजी पार्क, हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी, फुल मार्केट अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. दादरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आता फोटोंच्या माध्यमातून अधोरेखित करायचा आहे. मग वाट कसली बघताय? घरात धूळ खात पडलेला कॅमेरा साफ करा आणि रविवारी तुमची फोटोग्राफी दाखवायला रेडी राहा!

असे व्हा सहभागी
जर या फोटो वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल, तर दादर सांस्कृतिक मंचच्या फेसबुक पेजवर जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनी रविवारी सकाळी 7.30वाजता शिवाजी पार्क इथल्या समर्थ व्यायाम मंदिर येथे एकत्र यायचं आहे. त्यानंतर ग्रुप केले जातील. मग हेरिटेज वॉकला सुरुवात केली जाईल.