जालना : शेतकर्यांच्या छातीवर नव्हे, पायांवर गोळी झाडायला पाहिजे होती, असे वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले होते. दानवे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आणखी वादग्रस्त विधान केले आहे. शेतकर्यांच्या पायावर नव्हे, रावसाहेब दानवेंच्या बुडावरच गोळी मारण्याची वेळ आता आली आहे, असे टीकास्त्र मुंडे यांनी सोडले. जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकर्यांच्या मागणीसाठी काढलेल्या हल्लाबोल मोर्चात त्यांनी हे वक्तव्य केले.
जालन्यात शेतकर्यांसाठी मोर्चा
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात कार्यकर्ते व शेतकर्यांना मार्गदर्शन करताना धनंजय मुंडे यांनी दानवेंवर हल्लाबोल केला. मागील पंधरवड्यात नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शेतकर्यांनी ऊस आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी शेतकर्यांवर गोळीबार करण्यात आला होता. यात दोन शेतकर्यांच्या छातीत गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर दानवेंनी पोलिसांनी छातीवर नव्हे तर शेतकर्यांच्या पायावर गोळ्या झाडायला हव्या होत्या, असे वक्तव्य केले होते. नेहमीच ताळतंत्र सोडून वक्तव्य करणार्या रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्याचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांनी दानवेंच्या बुडावर गोळी मारण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.