मुंबई- आधीच राज्य सरकारने तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी न करता त्यांना हलाखीत ढकलले आहे. त्यातच आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांना शिवीगाळ केली. त्यांची भाषा दानवासारखी असून याप्रकरणी भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. यासाठी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यात शुक्रवारपासून आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना तूर खरेदी करूनही साले रडतात असे वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी मंत्रालयासमोरील विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखीच आहे. भाजपा नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करत आहेत. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून शेतकऱ्यांची सगळी तूर खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शेतकऱ्यांना शिवीगाळ करत आहेत. शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या दानवे यांच्याविरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असून दानवे यांना “साला दानवे” अशी पदवी काँग्रेसकडून देण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
दानवेंच्या विधानाबाबत भूमिका स्पष्ट करा – राधाकृष्ण विखे पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेला शिवराळ भाषेचा वापर म्हणजे अक्षम्य अनास्था व कोडगेपणाचे प्रतिक असून या विधानाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
एकिकडे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे सांगून नवनवीन घोषणा करीत आहेत. राज्यातील शेतकरी सुजलाम-सुफलाम करण्याचा आव आणला जात आहे. दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांच्या भावनांना ठेच लावणारी विधाने करीत आहे. या दुतोंडी भूमिकेतून भाजपाची शेतकऱ्यांबद्दलची अनास्था दिसून येते, असेही ते म्हणाले.
विरोधकांच्या टीकेनंतर दानवेंची सारवासारव
दरम्यान, सर्व बाजूंनी टीका सुरू झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती देताना शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नसल्याचा खुलासा करत शेतकऱ्यांची मने दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे निवेदन जारी केले आहे.
१० मे २०१७ रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जालना भाजपा कार्यालयात बोलावण्यात आली होती. त्यावेळी बैठकीमध्ये तीन वर्षांची केंद्र सरकारची कामगिरी व अडीच वर्षांची राज्य सरकारची कामगिरी हेच विषय बैठकीत करावे अशा सूचना दिल्या होत्या. परंतु एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आणि पुन्हा केंद्र शासनाने एक लाख टन तूर खरेदीसाठी मान्यता दिल्याचे सांगितले. यामध्ये मी शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. मी स्वतः शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतकऱ्यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतकऱ्यांची बाजू घेत सतत ३५ वर्षे मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नसल्याचे सांगत माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.