नंदुरबार । शिवार संवादयात्रेदरम्यान, शेतकर्यांसोबत हितगूज करणार्या रावसाहेब दानवे यांनी मनोगत पूर्ण करून शासकीय योजनेची माहिती देत असताना ‘त्याच’ वादग्रस्त शब्दाचे पुन्हा उच्चारण केल्याने बसलेले शेतकरी व कार्यकर्ते अवाक झाले. नंदुरबार मध्ये हा प्रकार गुरुवारी घडला. नेत्यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर बोलीभाषेतील शब्द असल्याने उच्चार केला गेल्याची सारवासारव दानवे यांनी केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शहादा तालुक्यातील नांदरखेडा येथे 500 शेतकर्यांच्या उपस्थितीत शिवार संवादयात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी दानवे यांनी शेतकर्यांसोबत हितगूज करत संवाद साधला. शहादा पालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या नांदरखेडा येथील शेतात झाडाखाली बसून दानवे यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली़. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ़ हीना गावित, आमदार डॉ़ विजयकुमार गावित, भाजपाचे विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.