दानवे, भाजप आणि साला!

0

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना अघळपघळ बोलणे चांगलेच महागात पडणार आहे, असे दिसते. दानवेंसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याने कधी, कुठे, केव्हा, काय बोलावे याचे तारतम्य बाळगू नये, याचे सखेद आश्‍चर्य वाटते. दानवे जसे विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले आहेत, तसेच ते भाजपअंतर्गत राजकारणाचे बळीही ठरू पाहत आहे. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले दानवे आता आपला हा दावा स्वतःच्याच तोेंडाने मोडीत काढून बसले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यापूर्वी धरणात मुतण्याची भाषा केली होती. जेथे शेतकरीवर्गाशी निगडित मुद्दा असतो, तेथे थोडे जबाबदारीनेच बोलले पाहिजे, याचे भान राजकीय नेत्यांना कसे राहत नाही, याबद्दल आश्‍चर्य वाटते. दादांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अशीच राळ उठली होती. शेवटी एकदिवस त्यांना आत्मक्लेश करावा लागला. दादांसाठी शरद पवारांना महाराष्ट्राची माफी मागावी लागली. त्यानंतर दादांच्या भाषेत कमालीचा बदल झाला. जे झाले त्यामुळे दादांना जन्माची अद्दल घडली. वास्तविक पाहता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे अघळपघळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते जसे आहेत तसेच बोलतात. मराठवाड्यात साला शब्द हा प्रत्येकाच्या तोंडी अगदी सर्रास असतो. ती शिवी नाही, बोलताना सहजपणे बोलला जाणारा तो एक सामान्य शब्द आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात सामान्यपणे सहज बोलायचे म्हटले, तरी एक तरी शिवी सहज तोंडातून बाहेर पडते. त्या भागातील जी काही नेतेमंडळी आहेत, ती अगदी भाषणातही बोलताना अशाप्रकारच्या शब्दांचा वापर करतात, त्याचे कुणाला काहीच वावगे वाटत नाही. इतकी तूर खरेदी केली तरी रडतात साले! हे दानवेंच्या तोंडातून सहज निघालेले वाक्य आहे. सत्तेच्या माजातून हे वाक्य आले, असे कुणाला वाटणे साहजिक आहे. कारण दानवे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तो पक्ष सत्ताधारी आहे. दानवेंनी बोलताना भान ठेवायला हवे होते. ते भान त्यांना राहिले नाही. अर्थात यावर्षी तुरीचे उत्पादन अधिक झाले. अपेक्षेपेक्षा जास्त झाले. त्यामुळे शेतकरी आणि सत्ताधारी असे दोघेही अडचणीत आले आहेत. तूर उत्पादनासाठी सरकारनेच प्रोत्साहन दिल्यामुळे जे झाले त्याला सरकार जबाबदार आहेत. तथापि, तूर खरेदी करण्याची सरकारची मानसिकता आहेच, ती जबाबदारी सरकारने टाळली नाही. प्रत्यक्षात तूर विक्रीला गेल्यानंतर शेतकरीवर्गास वाईट अनुभव येत आहेत. अद्यापही असंख्य शेतकरी तूर घेऊन बाजार समित्यांत उभे आहेत. हा प्रशासकीय गोंधळ असून, त्याची जबाबदारी सरकार नावाच्या यंत्रणेला टाळता येणारी नाही. आणखी एक लाख टन तूर सरकार खरेदी करणार आहे, हे खरे आहे. दानवे तेच म्हणाले. परंतु, त्यांची सांगण्याची भाषा चुकीची होती. अर्थात, आपल्या नेहमीच्या अघळपघळ भाषेत ते बोलले असले, तरी आधीच संतप्त असलेल्या शेतकर्‍यांना ते आवडणारे नव्हते, अन् नाही. त्याचाच राजकीय फायदा आता विरोधक घेत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दानवे आपल्या वाचाळपणामुळे चर्चेत आहेत. कालपर्यंत ते जे बोललेत ते चालून गेले आता मात्र प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया अन् राजकीय विरोधकांनी पराचा कावळा करत दानवेंवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामागे मोठे राजकारण शिजत असून, हा सर्व प्रकार अगदी नियोजनबद्ध आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली भाजपात गतिमान झाल्या होत्या. मुख्यमंत्रीपदी प्रदेशाध्यक्ष दानवे व चंद्रकांतदादा पाटील यांची नावे चर्चेत होती. पैकी चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्रीपदासाठी स्पष्ट नकार दिला. दानवेंनी मात्र आपल्याला पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू, असे सांगून अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदासाठी शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले तसेच फडणवीस कुठेही जाणार नाहीत? असे सांगण्याची गुगलीही टाकली होती. दानवेंची ही मनीषा लक्षात घेता ते नागपुरी चाणक्यांच्या डोक्यात बसलेत. यापूर्वी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अन् विनोद तावडे हेदेखील नागपुरी चाणक्यांना असेच खटकले होते. त्यामुळे वेळ अन् काळ पाहून या मंडळींना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणले गेले. त्यासाठी सोशल मीडिया अन् प्रसारमाध्यमांचा मोठ्या खुबीने वापर केला गेला. काय गंमत आहे पाहा, सोशल असो किंवा इतर प्रकारचा मीडिया. हा सर्व मीडियावर नागपुरी चाणक्यांचे पूर्णपणे वर्चस्व आहे. एखाद्या नेत्याला राजकीय जीवनातून कायमचे उठवायचे असेल, तर तसे काम ही मंडळी करत असते. काल खडसेंसोबत जे झाले तेच आता दानवेंबाबतीत सुरू आहे. दानवेंविरुद्ध जी मीडिया ट्रायल सुरू आहे, ती धोकादायक आहे. बहुजन नेत्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करणारी आहे.

दानवे जे काही बोलले ते असमर्थनीय आहे. परंतु, त्यांची नेहमीचीच बोलण्याची भाषा अन् पद्धत पाहता, ते जाणीवपूर्वक बोलले असा त्याचा अर्थ होत नाही. राज्यात दानवेंच्या पूर्वीही अनेक नेत्यांनी अशाप्रकारची वादग्रस्त विधाने केली आहेत. ती विधाने काही नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला कायमची चिकटली आहेत. एकदा ती चिकटली की ते निस्तारताना त्यांची त्रेधातिरपीट होते, हे दृश्य महाराष्ट्राने अनेकवेळा पाहिले आहे. पूर्वी जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया नव्हता तेव्हा मी असे बोललोच नाही, पेपरवाल्यांनी चुकीचे छापले असे म्हणायची सोय होती. आता तशी सोय राहिली नाही. दानवेंचे अख्खे भाषण न दाखवता, तो ‘साला शब्द’ उच्चारण्याचे वाक्य सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने किमान हजारवेळा दाखवले असेल. तेच वाक्य सोशल मीडियावर वार्‍यासारखे पसरले. अख्ख्या राज्याने त्या कार्यकर्ता बैठकीत दानवे काय बोलले हे न पाहता, ऐकता केवळ ते शेतकर्‍यांना ‘साला’ म्हणाले, एवढेच पाहिले व ऐकले. त्यामुळे एका क्षणात जनमत भाजपविरोधात गेले. दानवेच नाही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी व खास करून बहुजन समाजातील नेत्यांनी ही बाब आता लक्षात ठेवली पाहिजे. दानवेंबाबतीत जे काही घडले त्यातून इतर नेत्यांनी बोध घेणे ही त्यांच्यासाठी काळाची गरज आहे. बोलताना चुकलात तर कुणाचाही ‘साला दानवे‘ होऊ शकतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, तसे वागावे. दानवेंनीही अजित पवारांच्या अनुभवातून काही बोध घेतला असता, तर आजची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली नसती. उद्या प्रत्येक निवडणुकीत दानवेंच्या या वक्तव्याचा वापर केला जाईल. भाजपला शेतकरीविरोधी ठरवण्यासाठी विरोधकांच्या हाती आयते कोलीत दानवेंनी नकळतपणे दिले आहे.

माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी एकदा अकोला येथील जाहीरसभेत केलेल्या विधानावरून असाच वाद झाला होता. कापसाचे वजन जास्त भरावे म्हणून शेतकरी कापसाच्या बोंडावर पाणी मारतात, असे स्व. देशमुख म्हणाले होते. आता त्यात विलासराव काय चुकीचे बोलले? तर काहीच नाही. परंतु, त्यांच्या वक्तव्यावरून असेच मोठे वादळ उठले. विरोधकांनी या वक्तव्याचा पुरेपूर राजकीय वापर त्यावेळी विदर्भात करून घेतला, त्याची मोठी राजकीय किंमत काँग्रेसला मोजावी लागली होती. आतादेखील दानवेंच्या या वक्तव्याची मोठी राजकीय किंमत भाजपला मोजावी लागणारच आहे.

स्व. आर. आर. पाटील यांचाही किस्सा सर्वांना ठाऊकच आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य वेळीच लक्षात न आल्याने स्व. आबांनी त्यावेळी ‘ऐसे बडे बडे शहरो में असे हादसे होते है’ असा डायलॉग मारला होता. त्यांच्या वक्तव्यावरूनही महाराष्ट्रात जोरदार राजकीय वादळ उठवले गेले. राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची संधी कुणीही सोडली नाही. शेवटी शरद पवारांना आबांचा राजीनामा घ्यावा लागला. आबांचे हिंदी कच्चे असल्याने ते असे बोलून गेले आहेत, हे सर्वांच्या लक्षात आले होते. परंतु, राजकारणात चुकीला माफी नसते, विरोधक ती संधी सोडत नसतात. त्याचा फटका आबांना बसला होता. तीच गत आता रावसाहेब दानवे यांची झाली आहे. आपल्या अघळपघळ बोलण्याचा त्यांना मोठा राजकीय फटका बसला आहे. एका दगडात अनेक पक्षी मारणारे आता बरोबर किती पक्षी पडतात ते मोजण्यात गुंग झालेले आहेत. नुकतेच त्यांनी केलेले कर्जमाफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाहीत हे विरोधक लिहून देणार का? असे संतापजनक वक्तव्य विस्मरणात जात नाही तोच त्यांचा साला हा शब्द वादात सापडला आहे. त्याचे राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागतील अन् ते दूरगामी असतील हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची गरज नसावी. पक्षात आधीच नागपुरी चाणक्यांच्या डोळ्यावर आलेले दानवे आपल्याच बोलण्यामुळे पाय खोलात घालून बसले आहेत. त्यांनी आता अजितदादांचा कित्ता गिरवत एक दिवसाचे का होईना आत्मक्लेश करून घ्यावे, असा सल्ला आम्ही त्यांना देऊ इच्छितो.

पुरुषोत्तम सांगळे- 8087861982