दापोडी ते निगडी बीआरटीला ग्रीन सिग्नल

0

पिंपरी-चिंचवड : गेल्या 10 वर्षांपासून रखडलेला दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गाच्या सुरक्षिततेबाबत आयआयटी पवईने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर या मार्गास हिरवा कंदील मिळणार आहे. महिनाभरात हा मार्ग सुरू होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्त केली.

महापालिकेचा जेएनएनयूआरएम योजनेत समावेश झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने बीआरटी मार्ग उभारण्याची योजना आखली. सुरुवातीला पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते भक्ती-शक्ती चौक असे नियोजन केले. कामेही सुरू झाली. मार्गिका उभारण्यात आल्या. बसस्टॉपची कामे झाली. या एकाच मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी आणि सामान्यांसाठी स्वतंत्र लेन अशा एकूण तीन प्रकारची वाहतूक व्यवस्था असल्याने बीआरटी यशस्वी होणार नाही, असा सूर आळविण्यात आला. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल झाली.

याचिकेमुळे रखडले
दरम्यान, लेन तयार करूनही वापर होत नसल्याने त्या वेळी काँग्रेसने लेन इतर वाहतुकीसाठी खुल्या केल्या होत्या. तसेच तत्कालीन सदस्या सीमा सावळे आणि आशा शेडगे यांनी विरोध केला होता. याचिकेवरील सुनावणीत सेफ्टी ऑडिट करूनच मार्ग सुरू करावा, तोपर्यंत न्यायालयाने या मार्गास ‘जैसे थे’ आदेश दिला होता. त्यानंतर गेले 10 वर्षे या मार्गाचे काम थांबले होते. प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्यानंतर स्थायी समिती सभापतींनी बीआरटीस विरोध दर्शविला आहे. दोनशे कोटींचा निधी परत गेला तरी चालेल. कोणाही निरपराध्याचा जीव जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

सुरक्षेच्या उपाययोजना
1सह शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, “आयआयटी पवईने केलेल्या सूचनांचा अहवाल 2 फेब्रुवारीला मिळाला. त्यानुसार 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत उर्वरित काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर कामापूर्वीची स्थिती आणि सूचनांनंतरची स्थिती असा अहवाल पाठविण्यात येणार आहे. तसेच न्यायालयातही याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर सर्व पदाधिकाजयांनाही सुरक्षिततेची माहिती दिली जाणार आहे. सोईस्कर वेळेनुसार हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. सर्वसाधारणपणे 15 दिवसांचा कालावधी यासाठी अपेक्षित आहे.’’

आयआयटी करणार तीन वर्षे पाहणी
2आयआटी पवईने पुढील तीन वर्षांसाठी सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. दर सहा महिन्यांनी त्यांचे पथक पाहणी करणार आहे. निरीक्षण नोंदवून अहवाल देणार आहे. या संदर्भातील विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या मार्गासाठी 200 पीएमपी बस सज्ज आहेत. त्यांना आरएफआयडी आणि जीपीएस बसविण्यात आले आहेत.

आयआयटीच्या अहवालातील सूचना
3स्पीड ब्रेकरवरील गेलेले पट्ट पुन्हा मारावेत. चौक ते बस स्टॉपपर्यंत जाणाजया पादचारी मार्गावर साईन असावेत. मार्गिकेवरील तुटलेल्या वाकलेल्या लेन सरळ कराव्यात. रेलिंग व्यवस्थित आहे किंवा नाही, याची पाहणी करावी.