दापोडी-निगडी दुहेरी बीआरटी मार्गात मेट्रोकडून घुसखोरी सुरुच!

0

आयआयटी पवईच्या तज्ज्ञांच्या पथकामार्फत पाहणी

पिंपरी : दापोडी-निगडी या दुहेरी बीआरटीएस मार्गावर पुणे मेट्रोने काम सुरू केले आहे. मेट्रोकडून पिंपरीतनंतर आता कासारवाडीतही बीआरटी मार्गात खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे तेथेही पिंपरीप्रमाणे बीआरटी मार्गात महापालिकेला बदल करावा लागणार आहे. त्यामुळे बीआरटी मार्गासह काही बसथांबेही पालिकेला स्थंलातरीत करावे लागणार आहेत. बीआरटी मार्गावर वाहने व प्रवाशांसाठी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आयआयटी पवईच्या तज्ज्ञांच्या पथकामार्फत पाहणी करून दिलेल्या अहवालानुसार या 25 किलोमीटर मार्गावर विविध सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत, असा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने केला जात आहे. अद्यापही हे काम सुरूच आहे. पुणे मेट्रोच्यावतीने मार्च महिन्यापासून खराळवाडी, पिंपरी चौक, मोरवाडी फिनोलेक्स चौक आणि शॉपींग मॉलपर्यंत बीआरटीच्या मार्गातच पिलर उभारणीचे काम वेगात सुरू झाले.

आता मेट्रोने कासारवाडी भुयारी मार्गाच्या जवळील बीआरटी मार्गावरच्या बाजूने लोखंडी पत्रे लावून खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे या मार्गावरील कासारवाडीचा बस थांबाही हटवावा लागणार आहे. खराळवाडी ते मोरवाडी चौकापर्यंतच्या मार्गानंतर कासारवाडीतही बीआरटी मार्गात मेट्रोचा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, मेट्रो मार्गावर बीआरटीचे बॅरिकेटस काढून तेथे संमिश्र बीआरटी करण्याची नामुष्की महापालिकेवर येणार आहे. दरम्यान, यावर महापालिका ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याने बीआरटीचा बली देण्याची त्यांची तयारी आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पूर्वीप्रमाणे कामाच्या सूचना
या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, दापोडी-निगडी बीआरटी मार्गात पुणे मेट्रोने केलेल्या कामाची पाहणी मेट्रोच्या अधिकार्‍यांसोबत केली आहे. त्यांना बीआरटी लेन वगळून पूर्वीप्रमाणे सर्व्हिस रस्ताने मेट्रोचे काम करण्याचा सूचना दिल्या आहेत. पिलर उभारलेले ठिकाणी बीआरटी संमिश्र असणार आहे.