निगडी : अनेक वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी बीआरटीएस अतीजलद बस सेवा मार्गावर मंगळवारी (दि.2) प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू केली जाईल. ही 12.50 किलोमीटर अंतराची बीआरटी सेवा सुरू करण्याबाबत महापालिका भवनात पालिकेत आढावा बैठक झाली. या बैठकीला महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर सह अभियंता राजन पाटील, अधिकारी आदी उपस्थित होते.
पुढील महिन्यात सुरक्षा अहवाल
दापोडी-निगडी बीआरटी मार्गाची सर्व तयारी झाली आहे. सर्व स्थानके अद्ययावत तंत्रज्ञानाने जोडली आहेत. या संदर्भातील सुरक्षा अहवाल आयआयटी पवईकडून जानेवारीच्या सुरूवातीला अपेक्षित आहे. त्या अहवालानंतर 15 जानेवारीला उच्च न्यायालयात माहिती दिली जाईल. न्यायालयाची परवानगी मिळताच ही सेवा सुरू केली जाणार आहे. मंगळवारी सकाळी प्रात्यक्षिक घेतल्यानंतर या मार्गावर आवश्यक बस मिळावेत म्हणून पीएमपीशी चर्चा झाली आहे. त्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील उर्वरित चार बीआरटी मार्ग लवकरच सुरू केले जातील. त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.