दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांना अटक करा

0

चाळीसगाव । अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा खुन होऊन चार वर्षे तर कॉ.गोविंद पानसरे यांचा खुन होऊन अडीच वर्षे उलटली. त्यांच्यानंतर प्रा.कुलबर्गी यांचा देखील निर्घुन खुन करण्यात आला. तीघांचे मारेकरी अद्यापही फरार आहे. त्यांना अटक करण्यात आलेली नाही. तसेच डॉ.दाभोळकर, कॉ.पानसरे यांच्या खुनातील आरोपींचा जलद गतीने शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी रविवारी 20 रोजी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या चाळीसगाव शाखेच्या वतीने करण्यात येत आहे. मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेड, पोलीस उपनिरीक्षक संजय पंजे यांना देण्यात आले.

या आहेत मागण्या
तीघांच्या मारेकर्‍यांच्या संशयीतांचे रेखाचित्रे ही राज्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावे, सारंग अकोलकर, प्रविण निंबकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेगडे ह्या े एन.आ.ए ला हवे असलेल्या सनातन संस्थेच्या फरार साधकांचे छायाचित्र सर्व पोलीस स्टेशनसहीत सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावे, खुनाच्या घटनांमधील आणि शासनाने दाखल केलेल्या आरोपपत्रात उल्लेखीत संशयित संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, सनातन संस्था व हिंदू जनजागरण समिती यांच्या साधकांची नावे तपासात पुढे आली आहे. या संस्थांविषयीची भुमिका जनतेसमोर मांडण्यात यावे यांसह विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

यांच्या स्वाक्षर्‍या
निवेदनावर खानदेश विभागीय संघटक दर्शना सरला अरुण, कार्याध्यक्ष राहुल झोडगे, डिंपल चौधरी, उमेश राठोड, रोहन पगारे, अश्‍विनी अवराम, निलेश राठोड, अरुण भोसले, खुशाल जाधव, प्रसाद माणे, चेतना माणे, गायत्री शिरोळे, श्‍वेता जगताप, जयंत भगत, देवेश देवकर, जागृती चौधरी, वैभव राजपुत, सायली चौधरी, हर्षल जाधव आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

तपासाची गती मंदावली
राज्य शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करुन देखील तपासामध्ये काहीही प्रगती दिसून येत नाही. डॉ.विरेंद्र तावडे यांना झालेली अटक आणि त्या निमित्ताने खुनातील षडयंत्र समाजाच्या समोर आणण्यासाठी शासनाने विशेष पथकाची नेमणुक करुन चौकशी सुरु केली आहे ते अभिनंदनहीय आहे, मात्र तपासाची गती मंदावल्याचे सध्या दिसून येत आहे. अद्यापही पुरोगामी विचाराच्या लोकातील भिती कमी झालेली नसल्याचे चित्र आहे.