दाभोळकर, पानसरे, कलबुर्गीनंतर तुम्हाला गोळी घालू

0

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत सलिम शेख यांना धमकी

इंदापूर : इंदापूर येथील रहिवासी, मुस्लिम समन्वय समिती प्रदेश कार्यध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत सलिम अबुलतीफ शेख यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारे पत्र घरपोच मिळाल्याने इंदापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यानंतर आता तुमचा नंबर आहे, अशी धमकीच या पत्रातून देण्यात आली आहे. तुमची हिंदूविरोधी कामे बंद करा, या पत्राची वाच्यता केलीत तर तिसर्‍याच दिवशी गोळ्या घालू, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला आहे.

एक गोळी तुमच्या नावाने शिल्लक
सलिम शेख यांना पाठविलेल्या पत्रात या धर्मांध माथेफिरूने म्हटले आहे की,
आपण स्वत:ला पुरोगामी चळवळीचा बादशहा समजता. आम्ही अद्यापपर्यंत दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासारखे पुरोगामींना अलगद संपविले आहेत. ते हिंदू असूनही हिंदूराष्ट्राच्या आड येत होते. त्यातले तुम्हीतर कडवे आहात. आता त्यांच्यानंतर तुमचाच नंबर आहे हे विसरु नका. आम्ही समाजवादी कार्यकर्ता औषधालाही शिल्लक ठेवणार नाही. तुमची वैचारीक चळवळ थांबवा, नाहीतर आमची गोळी तुमच्या नावाने शिल्लक आहे.

हिंदूराष्ट्रासाठी तुमची समिधा करून आहुती
हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी आम्ही तुमची समिधा करून आहुती देणार आहोत. आणि ती वेळ समीप आली आहे. हिंदू राष्ट्रनिर्मितीमधील पहिल्या मुस्लिम विचारवंताचा वध माझ्या हातून करण्याचा आदेश भारतमातेने दिला आहे. तुमची आजपर्यंतची सर्व कामे हिंदूविरोधी आहेत. ती कामे तुम्ही बंद करावीत, हा आदेश आहे. हा पहिला आणि शेवटचा आदेश आहे. हे पत्र मिळाल्यावर ते प्रसिद्ध केलेत तर त्याच्या तिसर्‍याचदिवशीच गोळ्या घालू, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.

अदखलपात्र गुन्हा दाखल
जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र सलिम शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच डीवायएसपी, बारामती यांच्याशी संपर्क साधून त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लागलीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश इंदापूर पोलिसांना दिले. इंदापूर पोलिसांनी 11 नोहेंबर 2017 रोजी रात्री 11 वाजता बाळासो पाटील सांगली याच्याविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य ओळखून घेवून इंदापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 506 प्रमाणे अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, शेख यांना संरक्षण देण्याबाबत पोलिसांनी काही निर्णय घेतला आहे का, याबाबत समजू शकले नाही.

डॉ. वैद्य, बाबा आढाव डीवायएसपींची भेट घेणार
याबाबत राष्ट्र सेवादल विश्‍वस्त डॉ. अभिजित वैद्य, बाबा आढाव हे डीवायएसपी यांना भेटणार असून आरोपीला लवकर अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणारआहेत. तर इंदापूर शहरातील अनेक समविचारी सामाजिक संघटना पदाधिकारी व राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी सलिम शेख यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. इंदापूर शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. आरोपीला लवकर अटक करुन त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.