मुंबई- डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागाची कबुली देणाऱ्या शरद कळसकर याचा ताबा मिळवण्यात अखेर केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) यश आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने कळसकरला सीबीआय कोठडी सुनावली असून आता सचिन अंदुरे आणि कळसकर या दोघांची सीबीआयला एकत्रित चौकशी करता येणार आहे.
राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ऑगस्टमध्ये वैभव राऊतसह पाच कट्टरवाद्यांना शस्त्र, स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यातील(यूएपीए) विविध कलमांनुसार अटक केली. कळसकरचाही अटक केलेल्या आरोपींमध्ये समावेश असून चौकशीत कळसकरने एटीएस अधिकाऱ्यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे सांगितले. कळसकरने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या पथकाने औरंगाबादमधून सचिन अंदुरेला अटक केली होती.
कळसकरचा ताबा मिळवण्यासाठी सीबीआयचे प्रयत्न सुरु होते. कळसकरचा ताबा मिळवल्यानंतर सीबीआयला कळसकर आणि अंदुरे या दोघांना समोरासमोर ठेवून चौकशी करता येणार होती. मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत सीबीआयला कळसकरचा ताबा मिळवता आला नव्हता. अखेर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कळसकरची रवानगी सीबीआय कोठडीत केली.