दाभोळकर हत्येप्रकरणी शरद कळसकरला २९ सप्टेंबरपर्यंत कोठडी

0

पुणे-अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. शरद कळसकरला २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला सीबीआयच्या पथकाने आज सोमवारी न्यायालयात हजर केले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याने न्यायालयाने शरद कळसकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. २९ सप्टेंबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, शनिवारी सीबीआयने न्यायालयात युक्तिवादादरम्यान नवी माहिती उघड केली होती. दाभोलकर यांची हत्या दुचाकीस्वार शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी केली. अंदुरे आणि कळसकर यांना मदत करण्यासाठी दोघे जण आधीच येऊन घटनास्थळी थांबले होते, असा दावा सीबीआयने केला होता. वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी चार पिस्तुलांची विल्हेवाट लावली आहे.२३ जुलै रोजी २०१८ रोजी त्यांनी पिस्तुलांची मोडतोड केली. पिस्तुलाचे तुकडे मुंबईतील खाडी पुलावरून खाली टाकून देण्यात आले. कळवा, भाईंदर येथील खाडी पुलावरून पिस्तुलाचे तुकडे टाकून देण्यात आल्याचा संशय असल्याचे सीबीआयने व्यक्त केला होता.