रावेर तालुक्यातील प्रकार ; तहसील प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी
रावेर- रावेर परीसरात अनेक दारीद्य्र रेषेखालील गरीब कुटुंब रॉकेलपासून वंचित असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. तालुक्यात रॉकेलचा काळाबाजार तर होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रावेर परीसराला व गाव-खेड्यांना रॉकेल महाराष्ट्र, मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या व रावेरपासून 25 किमी दूर असलेले पाल येथून हॉकर्सद्वारे रॉकेलचा कोटा दिला जातो मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून रॉकेल कुठेही वितरीत होतांना दिसत नाही त्यामुळे अनेक गरीब कुटूब बांधवांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. रावेर तालुक्याला सुमारे 30 हजार लिटर रॉकेलचा कोटा असून गरीबांच्या घरातील चूल पेटविण्यासाठी प्रशासन रॉकेलचा पुरवठा करते परंतु गाव खेड्यांवरही रॉकेल मिळत नसल्याने नेमके ते जाते कुठे? याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.