दारुच्या नशेत जाळली 27 वाहने

0

पुणे : दारुच्या नशेत एका दुचाकीचे पेट्रोल काढून ती पेटवून दिल्यानंतर शेजारी पार्किंग केलेली तब्बल 27 वाहने अगीच्या भस्मस्थानी पडली. दत्तवाडी परिसरातील जनता वसाहतमध्ये मध्यरात्री हे अग्नितांडव घडले. यामध्ये 24 दुचाकी, एक तीन चाकी टेम्पो आणि सायकल अशी 27 वाहने जळून खाक झाली. वाहनांच्या स्फोटाने जनता वसाहत भयभिती झाली होती. अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पहाटे एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिनेश उर्फ जब्या हरी पाटील (वय 25, रा. जनता वसहात) यास अटक केली आहे.

दाटीवाटीचा परिसर
दत्तवाडी परिसरातील जनता वसाहतीमध्ये दाटीवाटीने घरे आहेत. येथे दाटीवाटीने वाहने पार्किंग केलेली असतात शिवाय डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे. तेथे जाण्यास रस्ताही नाही. त्यामुळे हे रहिवाशी दत्तवाडीतून जनता वसाहतमध्ये जाण्यासाठी असणार्‍या डांबरी रस्त्यावर आपली वाहने पार्किंग करतात. मिळेल त्याठिकाणी वाहने पार्किंग केली जातात. जनता वसहात पोलीस चौकी शेजारी महापालिकेचे शौचालय आहे. शौचालयासमोर डोंगरावर आणि शेजारी राहणारे रहिवाशी वाहने पाकिर्ंंग करतात. दोन किलोमिटरचा रस्ता रात्री वाहनांच्या पार्किंगने भरलेला असतो.

शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वाहनांना आग लागली. येथून जाणार्‍या एका तरुणाने हा प्रकार पाहिला आणि आरडा-ओरड करुन नागरिकांना उठवले. शेजारीच पोलीस चौकी असल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशामक दलाला माहिती दिली. तोपर्यंत रहिवाशांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र, दाटीवाटीने लावण्यात आलेल्या गाड्यांनी काही वेळातच पेट घेतला. येरंडवणा अग्निशामक दलाचे नाना नटे, सुनील नाईकनवरे, सचिन वाघोले, सचिन अहिवळे, अमोल शिंदे यांनी काही वेळातच धाव घेतली. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केले होते. अवघ्या काही वेळातच वाहने अगीच्या भस्मस्थानी पडली. स्थानिक नागरिक, दत्तवाडी पोलीस व अग्निशामक दलाने अर्धा ते पाऊन तासात आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

इमारत असूनही अग्निशामक केंद्र सुरू नाही
अगीमध्ये 24 दुचाकी, एक तीन चाकी टेम्पो आणि दोन सायकली जळून खाक झाल्या. दरम्यान जनता वसाहत परिसरात अग्निशामक केंद्राची इमारत बांधण्यात आलेली आहे. मात्र, ते केंद्र अद्याप सुरु झालेले नाही. काही कालावधीपुर्वी गाडीची टेस्टिंगही झाली होती. मात्र, त्यानंतर त्याचे पुढे काय, झाले कळण्यास मार्ग नाही. मात्र, रात्री हे केंद्र सुरु असते, तर आगीची घटना इतक्या मोठ्या प्रमाणात घडली नसती, असे नागरिक बोलून दाखवत आहेत.

नशेत घडले वाहन जळीतकांड
पार्किंगच्या ठिकाणी इलेक्ट्रीक वायर्स किंवा कचरा असे, काही नव्हते. त्यामुळे आग लावण्यात आल्याचा संशय होता. त्यानुसार चौकशी करण्यात आली. दिनेश उर्फ जब्या पाटील बाबात पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगावर पेट्रोल पडलेले होते. त्याचा वास येत होता. तसेच, नागरिकांनीही त्याच्या बाबात माहिती दिली. त्यावेळी त्याने एका दुचाकीतील पेट्रोल काढले व ती दुचाकी पेटवल्याचे सांगितले. यापुर्वीही त्याने वाहनांची तोडफोड केली होती. त्याला दारुचे व्यासन आहे. त्याने नशेतच दुचाकी पेटवल्याचे सांगितले.

अजून हप्तेही फेडले नव्हते
जनता वसाहत परिसरात गोरगरीब लोक राहतात. दररोज काम करुन पोटाची खळगी भरणारी ही जनता वसाहत. मोलमजूरी तसेच मिळेल ते कामे करणारे हे लोक. अशा अनेकांची वाहने याठिकाणी पार्किंग केलेली होती. त्यातील काही दुचाकी कर्ज काढून हप्त्यांवर घेतलेल्या आहेत. तर, दोन दुचाकींचे क्रमांकही अद्याप आले नव्हते. या अगीमध्येे आर्थिक नुकसान झाले आहेच पण, उद्याचे काम कसे, करणार असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यांना मदतीची गरज आहे, असे येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश पवार यांनी सांगितले.