दारुबंदीसाठी महिला एकवटल्या

0

वरणगाव । गेल्या अनेक महिन्यांपासून वरणगावसह परिसरात अवैध धंदे व बेकायदेशीर हातभट्टी, देशी, विदेशी दारूंची खुलेआम विक्री होत असल्याने अनेक गरीब मजूर कुटूंबाची राखरांगोळी होत असल्याने मंगळवार ७ रोजी सकाळी ११.३० वाजता सिध्देश्वरनगरातील ६० महिलांनी वरणगाव पोलिसांना निवेदन देवून अवैध धंदे व दारू विक्री कायमची बंद करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
वरणगाव शहरासह २७ खेड्यामधे गेल्या कित्येक वर्षांपासून खुलेआम सट्टा, पत्ता, गांजा, गावठी दारू, देशी, विदेशी, विमल गुटखा, मनोरंजनाच्या नावाखाली व्हिडिओ गेम आदी अवैध व्यवसाय राजरोसपणे खुलेआम सुरु असल्याने सिध्देश्वर नगर व परिसरातील खेड्यामध्ये गोरगरीब मंजुरांचा रहिवास असल्याने मजूर आठवडाभर मजूरी करुन त्यांच्या कुंटूबांचा उदरनिर्वाह करीत असतात परंतू बहुतांश मजूरांचा पैसा अवैध धंदे यामध्ये वाया जातो. त्यामुळे कुटूंबामध्ये भांडणतंटे नित्याचे झाले आहे.

वरणगाव शहरातील २७ खेड्यांमधे अवैध धंदेवाईकांचा त्रास
सिध्देश्वर नगर व २७ खेड्यांमधे गुन्हेगारी पार्श्वभुमीचे लोक राहत्या घरीच हातभट्टीची गावठी दारू, विनापरवाना देशी दारुची सर्रासपणे विक्री करीत असतात. सदर लोकांना आर्थिक व राजकीय वरदहस्त लाभल्याने त्यांना कोणतेच भय नाही. सदर वस्तीत मजूर वर्ग राहत असल्याने बेकायदेशीर धंदे याबाबत तक्रार करण्यास धजावत नाही व त्रास निमुटपणे सहन करीत असल्यामुळे या अवैध दारूविक्री करणार्‍यांचे मनोधैर्य वाढले आहे. यामुळे दारुडे कोणाशीही व कोणालाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करीत असतात. यामुळे या भागात महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच महिलांचे घराबाहेर वावरणे कठीण झाले असून अल्पवयीन मुले व तरुणांना व्यसनाची सवय लागण्याची शक्यता नाकारता येत नाही व मोलमजूरी करणारे मजुरांचा सर्व पैसा, दारू, सट्टा, पत्ता आदींमध्ये खर्च होत असल्याने कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत आहे.

यांच्या आहेत स्वाक्षर्‍या
निवेदनावर सामाजिक महिला कार्यकर्त्या सविता माळी, कस्तुराबाई इंगळे, कलाबाई सुरवाडे, वत्सला मोरे, आशा भालेराव, सरूबाई जवरे, भारती बोदडे, बेबीबाई इंगळे, रिजवानाबी फकीर, सुरेखा बावस्कर, सुरेखा निकम, आशा वानखेडे, संगीता मेढे, पंचशीला झाल्टे, सरूबाई वाघमारे, लता प्रधान आदींसह ६० ते ७० महिलांच्या स्वाक्षर्‍या आहे.

पोलिसांचे होतेय दुर्लक्ष
अवैध धंदे बंद करण्यासाठी २१ ऑक्टोबर रोजी युवक काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनांचा इशारा देत पोलिस प्रशासनास निवेदन देण्यात आले होते व ओझरखेडा, तळवेल, विल्हाळे, जाडगाव, मन्यारखेडा येथील महिलांनी सुध्दा कायमची दारु बंद व्हावी यासाठी देखील वरणगाव पोलिसांना व वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्यापही पोलिसांनी कारवाईचा बळगा उचलला नाही. पोलिसांच्या अशिर्वादाने व आर्थिक हितसंबंधामुळे खुलेआम सुरू
असल्याची चर्चा आहे.