दारुबंदीसाठी सरसावल्या रणरागिणी

0

भुसावळ। तालुक्यातील वांजोळ्यासह रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे बेकायदेशीर देशी-विदेशी दारूच्या विक्रीने महिलांच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याने संतप्त रणरागिणींनी पोलीस ठाण्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात धडक देत मंगळवारी संताप व्यक्त केला. तातडीने या गावांमध्ये दारूबंदी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रसंगी देण्यात आला. वांजोळ्याच्या संतप्त महिलांनी पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या कार्यालयावर मंगळवार, 29 रोजी धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. वांजोळा गावात अशोक तुकाराम कोळी, शिवदास बुधो सपकाळे, सुभाष वना मोरे तसेच मिरगव्हाण गावातील जयसिंग हे लोक गावात बेकायदेशीर दारू विक्री करीत असल्याचा आरोप करण्यात आला.

मद्यपींचा उपद्रव
वांजोळा गावात दारू मुळे वाद निर्माण होणे, शाळकरी तरुणींची छेडखानी करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे गावाचे वातावरण दूषित झाले आहे. पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच गावात दारूबंदी करावी अशी मागणी करण्यात आली असून दारुबंदी न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील संतप्त महिलांनी नीलोत्पल यांच्याकडे दिला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी ललिता ढाके, कल्पना मोरे, अनिता भालेराव, शोभा सपकाळे, मनिषा मोरे, रेखा मोरे, आशा मोरे, रंजना मोरे, सकुबाई मोरे, अनिता मोरे, संगिता मोरे, सुरेखा मोरे, बबिता पाटील, राधा पाटील, नथाबाई सावळे, अरुणा सावळे, जोत्स्ना सावळे, पद्मा पाटील, ललिता पाटील, मनिषा पाटील, विमल सावळे, ज्योती मोरे, जनाबाई धनगर, शोभा तायडे, अर्चना मोरे, सुनीता सावळे, रेखा तायडे, प्रमिला मोरे, लता सपकाळे, उज्वला सावळे, शोभा सावळे, सविता सावळे, रत्ना सावळे, शोभा बाऊस्कर आदी महिला उपस्थित होत्या.

राज्य उत्पादन शुल्क विभागावर धडक
रावेर। रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याने गावातील लहान मुले, तरुण व वयोवृद्ध व्यसनांच्या आहारी गेलेे आहेत. त्यामुळे गावात वाद-विवाद वाढले आहेत. गावठी दारूमुळे आजारही उद्भवू लागले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सावदा पोलीस स्थानकावर मोर्चा काढला मात्र याठिकाणी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या महिलांनी भुसावळ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकार्‍यांना निवेदन दिले.

ऐनपूरप्रमाणे मोठा वाघोद्यातही व्हावी बाटली ‘आडवी’
महिलाशक्तीच्या एकजुटीमुळे जवळच्या ऐनपूर गावात दारूबंदी होवून विक्रेत्यांना गाशा गुंडाळावा लागला. मोठा वाघोदा गावातही ऐनपूरप्रमाणे दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलावर्गाने केली आहे. वाघोद्यातील सर्व समाजातील महिला पुढे सरसावल्या आहेत. सावदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी निवेदन स्विकारले. वाघोदा येथे अवैधरित्या होणारी दारू विक्री थांबवण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिली.