दारुमुक्तीसाठी पोलिसांची धडपड

0

सिल्लोड । हायवेवर असलेले सर्वच बीअर बार बंद झाले. तालुक्यात केवळ 3 बीअर बार सुरू आहेत. बारवर तोबा गर्दी होत आहे. अवैध दारूविक्री सुरू आहे. ही अवैध दारू विक्री रोखून सिल्लोड तालुका दारूमुक्त करण्याचा संकल्प सपोनि शंकर शिंदे यांनी केला आहे. यामुळे तळीरामांची पंचायत होत आहे. हॉटेल, दारू पिऊन वाहन चालवणार्‍या तळीरामांमध्ये घबराट पसरली आहे.

पुरुषांमुळे त्रस्त महिलांना दिलासा
सिल्लोड तालुक्यात दारू मुक्तीसाठी ग्रामीण पोलीस धडपड करीत असले तरी तळीराम याला किती प्रतिसाद देतात हे महत्वाचे ठरणार आहे. त्यांनी ठरवले तर हे शक्य आहे. नाही तर ते तळीराम कुठूनही कुणालाही चकवा देऊन चपटी मिळवतातच हे विसरून चालणार नाही. यासाठी सर्वांनीच विडा उचलण्याची गरज आहे. कधी नव्हे हे पाऊल पोलिसांनी उचलले आहे. त्यांना मदत करण्याची खरी गरज आहे. समाजाला लागलेली दारू व्यसनाची कीड नष्ट करून दारूमुक्त गाव करून युवकांच्या आयुष्याच्या नवीन सूर्योदय करण्याचा संकल्प सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन कापुरे यांनी केला असला तरी जोपर्यंत तळीराम दारू पिणे सोडत नाही तोपर्यंत दारू बंद करणे शक्य नाही. पण पोलिसांची धडपड बघून घरातील पुरुषांच्या व्यसनापाई त्रस्त असलेल्या महिलांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.