भुसावळ । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतराच्या आत असलेले वाईन शॉप, परमीट रूम, बिअर बार, बिअर शॉपी, सरकारमान्य दारू दुकाने अशा ठिकाणी मद्यविक्री होते. अशी सर्व ठिकाणे 1 एप्रिलपासून बंद करण्यात आली असतांना सुध्दा वरणगाव शहरात खुलेआम चढ्या भावाने वरील दुकानांवर मद्यविक्री सुरू असून भुसावळ तालुका दारूबंदी विभागाचे दुर्लक्ष होत असून उच्च न्यायालयाच्या नियमांची पायमल्ली होतांना दिसून येत आहे. मुंबई – नागपूर महामार्ग हा वरणगाव शहरातून गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार महामार्गावर 15 ते 20 मद्यविक्री दुकानांवर बंदीचे आदेश 1 एप्रील पासून लागू केला आहे.
आवक- जावक केलेल्या मद्याची नोंद
न्यायालयाच्या निर्णयानंतर तालुक्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत किंवा सुरु हे तपासण्यासाठी भुसावळ तालुका दारुबंदी विभागाच्या अधिकार्यांनी वरणगाव शहर व महामार्गावरील सर्वच मद्यविक्री ठिकाणावर जावून त्याच्याजवळील आवक आणि जावक केलेला मद्याची नोंद घेण्यात आली आहे. मात्र दारुबंदी विभागाच्या दुर्लक्षानुसार मद्यविक्री व्यवसायिक जुना मद्यमाल तळीरामांना चढ्या भावात विक्री करीत आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे खुलेआम पायमल्ली होतांना दिसून येत आहे. मार्च महिन्यात मद्यविक्री व्यवसायिकांना न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावरील मद्यविक्री दुकाने बंद करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
पोलीसांकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच दारु दुकानादाराचे धाबे दणाणले होते. मात्र सर्वच मद्यविक्री व्यवसायिकांचे राजकीय व शासकीय पदाधिकारी सोबत मधूर संबध असल्याने छुप्या मार्गाने विक्री सुरू आहे. दारूबंदी विभागाचा न्यायालयाच्या आदेशाने व्याप वाढल्याने स्थानिक जवाबदारी पोलिसांची मानली जाते. मात्र शहरातील पोलिसाकडे नागरीक मद्यविक्री संदर्भात तक्रार विषयी गेला तर हि जबाबदारी आमची नसून दारू विभागाची आहे. असे आपल्यावरील घोंगळे दुसर्या वर लोटण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाची पायमल्ली होतांना दिसून येत आहे.
गांभिर्याने लक्ष देण्याची गरज
वरणगाव शहरातून जाणारा महामार्गावर नेहमीच अतिशय वर्दळ असते. तसेच अपघाताचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे दारु पिऊन वाहने चालविण्याने यात आणखीच भर पडत असते. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी न खेळता पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित दारु विक्री करणार्या दुकानदारांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
पुढार्यांचा वरदहस्त
महामार्गावर होणारे वाढते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता न्यायालयाने महामार्गालत असलेल्या 500 मीटच्या अंतरावरील दारुची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे वरणगाव परिसरात दिसून येत आहे. या दारु विक्रेत्यांचे राजकीय पुढार्यांशी असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेता पुढार्यांच्या वरदहस्ताने महामार्गालत मद्य शोकीनांकडून जास्तीचे पैसे उकळून दारुची खुले आम विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. यावर दारुबंदी विभागाने कारवाई करण्याची आवश्यकता असताना देखील त्यांचे दुर्लक्ष होत आहे. तर पोलीस प्रशासन हि आमची जबाबदारी नसल्याचे सांगून टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे या दारु विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे.