दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर कैचीने वार

जळगाव- दारुसाठी पैसे न दिल्याने एकाने 19 रोजी सुप्रिम कॉलनीत तरुणावर कैचीने वार केले. जखमी तरुणाच्या दवाखान्यातील जबाबावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली.
जखमी प्रशांत पंडितराव साबळे (वय 28, रा.गजाजन महाराजांच्या मंदिरामागे, सुप्रिम कॉलनी) यांच्यावर डॉ.÷उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे जबाब पोलिसांनी घेतले. त्यानुसार प्रशांत साबळे हा तरुण सुप्रिम कॉलनीतील शारदा हायस्कूल परिसरातील मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. मित्रांच्या भेटीनंतर तो सुप्रिम कॉलनीतील रिक्षा स्टॉपकडे सायंकाळी पायी जात होता. तो साहेबरावच्या अड्ड्यासमोरुन जात असताना त्यास भिकन सुतार ऊर्फ बबल्या शेंड्या भेटला. त्याने दारुसाठी 20 रुपये मागितले. परंतु, पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने प्रशांत साबळे याच्या पोटावर कैचीचे वार केले आणि तो तेथून पसार झाला. तेथील मित्रांनी प्रशांत साबळे याला रुग्णालयात हलविले. साबळे याच्या तक्रारीवरुन भिकन सुतार ऊर्फ बबल्या शेंड्या याच्या विरुद्घ एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फरार आरोपी सुप्रिम कॉलनीत आल्याचे कळताच पोलिसांनी त्यास अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, सतीश गर्जे, साईनाथ मुंढे आदींनी केली.