बारामती । भिगवण बाजारपेठेशेजारी दलित वस्तीच्या मध्यावर असलेले देशी दारुचे दुकान तातडीने स्थलांतरीत करण्यासाठी रिपब्लिकन जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्यमार्गावरील दारु दुकाने बंद करून ती लोकसंख्येच्या पटीत 500 मीटर आणि 225 मीटर स्थलांतरीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील बहुतांश दारु दुकानांना टाळे लावण्यात आले.
भिगवण गावात पूर्वेला बारामती- अहमदनगर राज्यमार्ग जातो तर पश्चिमेला पुणे-सोलापूर महामार्ग जातो. त्यामुळे येथील बहुतांशी दुकानांना जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने दुकाने चालू झाली नाहीत. तर भिगवण येथे गेल्या 35 वर्षापासून असलेले देशी दारु दुकाने राज्य उत्पादन खात्याच्या परवानगीने सुरू झाले. परंतु हे दुकान वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी असून या दुकानाच्या समोरून विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. त्यमाळे या दुकानाचे स्थलांतर करावे, असे रिपब्लिकन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार यांचे म्हणणे आहे. याबाबत शेलार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. अन्यथा 27 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.