बोदवड। संपूर्ण शहर आणि सर्व नगरसेवकांचा विरोध असूनही दारुच्या दुकानावर अद्यापही कारवाई होत नाही. या दिरंगाईच्या निषेधार्थ एकदिवसीय लाक्षणीय उपोषण करण्याचा इशारा सेवा संघर्ष समिती आणि रहिवाशांनी दिला आहे. बोदवडमधील प्रभाग क्रमांक 13 मधील मनूर रोडवरील भरवस्तीत देशी दारुचे दुकान स्थलांतरास पालिकेने दिलेली एनओसी आणि त्यावरून उठलेला धुराळा अजूनही खाली बसलेला नाही. या दुकानाला दिलेली एनओसी रद्द करावी, असा ठराव पालिका सभागृहाने मंजूर केला होता.
यानंतर जिल्हाधिकार्यांनी तातडीने कार्यवाही करून दुकान बंद करावे, अशी मागणी होती. मात्र, कोणत्याही हालचाली नाहीत. यामुळे प्रभाग क्रमांक 13, 16 आणि 17मधील रहिवासी सेवा संघर्ष समितीने 13 जुलैला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्यांनी नगराध्यक्षांना निवेदन दिले. त्यावर शांताराम कोळी, भास्कर गुरचळ, सुनील सूर्यवंशी, धनराज माळी आदींच्या स्वाक्षर्या आहेत. दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी मध्यंतरी शहरातील शिष्टमंडळाने माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतली होती. स्वत: खडसेंनी उत्पादन शुल्क विभागाशी बोलून नागरिकांच्या मागणीची दखल घ्या, अशी सूचना केली होती. मात्र, त्यांच्या सूचनेचीदेखील राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही.