पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा इशारा
जळगाव : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून त्यांचा आनंद अधिक द्वीगुणित व्हावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे बार आणि हॉटेल्स सुुरु ठेवण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर वाद, विवाद, अपघात व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. थर्टी फर्स्टचा जल्लोष करताना मद्यप्राशन करुन वाहन चालविले किंवा रॅश ड्रायव्हींग केली तर संबंधित व्यक्तीचा वाहन परवानाच निलंबित करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिला आहे.
मद्यप्राशन करुन ड्रायव्हिंग ; जागेवरच 2 हजाराचा दंड
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सोमवारी सर्व प्रभारी अधिकार्यांना गेल्या दोन वर्षात थर्टी फर्स्टला कुठे वाद किंवा अनुचित घटना घडली असेल तर तेथे अधिक खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक अधिकार्याने रात्रभर गस्तीवर राहण्याचीही तंबी देण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात रात्री 12 ते पहाटे 3 या काळात नाका बंदी केली जाणार आहे. मद्यप्राशन करुन वाहन चालविताना आढळल्यास वाहन परवाना निलंबित करण्यासोबत ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे. मद्याचे प्रमाण तपासण्यासाठी महामार्ग व मुख्य चौकात थांबणार्या पोलिसांजवळ ब्रेथ अॅनालायझर यंत्र देण्यात येणार असून जागेवरच दोन हजाराचा दंडही केला जाणार आहे.
नववर्षाचे स्वागत करताना मद्य प्राशन करुन कोणीही वाहन चालवू नये. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा. आपण व्यवस्थित असलो तरी समोरची व्यक्ती कसे वाहन चालविते, त्याच्यापासूनही धोका होऊ शकतो. वाहन परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविला जाईल.आज रात्री संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली जाणार आहे. डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक