पिंपरी-चिंचवड : पिंपळे निलख येथे पहाटे दारु पिणार्या टोळक्याला इथे दारु का पिता असे हटकल्याचा राग आल्याने एका व्यक्तीच्या डोक्यात बीअरची बाटली मारुन त्याला गंभीर जखमी कऱण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि.1) पहाटे एकच्या सुमारास पिंपळे निलख येथील शिवाजी चौकात घडली. याप्रकरणी अशोक सुरेश शिंदे (वय 34) विशाल सुरेश शिंदे (वय 30, दोघे रा. भांडेवाडा, पिंपळे निलख) या सख्ख्या भावांना अटक केली आहे. याप्रकरणी जखमी चाणक्य ऊर्फ रोहीत कैलास भांडे (वय 34 रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डोक्यात बाटलीही फोडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भांडे यांच्या घरासमोर दोन्ही भाऊ दारु पित बसले होते. यावेळी भांडे यांनी तुम्ही इथे का दारु पिता, घरी जाऊन प्या असे बोलताच दोघांनी भांडे यांना शिवीगाळ केली. नंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात बीअरची बाटली फोडली. यामुळे भांडे पळाले असता त्यांच्या पाठीत व उजव्या हातावर कोयत्यानेही वार केले. यामध्ये भांडे गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींवर जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.