दारूची बेकायदा वाहतूक करणार्‍या सहा जणांना अटक

0

तळेगाव : देशी -विदेशी दारूची बेकायदा वाहतूक करणार्‍या सहा जणांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन वाहनांसह 11 लाख 78 हजार 422 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पुणे- मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा (ता.मावळ) येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन आत्माराम बारसकर (वय 47), गोपाल दुर्गाई शर्मा (वय 19) दोघे रा. वडगाव – तळेगाव फाटा ता. मावळ), सुरेश नामदेव ढमाले (वय 40, रा. मोरया चौक , वडगाव ता. मावळ), अनिल काशिनाथ तरस (वय 36), संजय वसंत तरस (वय 42) दोघे रा. मुकाई चौक, किवळे ता. हवेली) रेशीमलाल साधुराम लालका (वय 27, रा. सातेगाव ता.मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत 11 लाख 78 हजार 422 रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या काही हॉटेल व ढाब्यांवर बेकायदा देशी -विदेशी दारू विक्री सुरु असल्याच्या माहितीवरून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक व देहूरोड उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगुळकर हा अवैध व्यवसायास लगाम घालण्यासाठी स्वतः लक्ष देत आहेत.