दारू दुकानांच्या नावासाठी आचारसंहिता!

0

मुंबई : प्लास्टिक बंदीचा वादग्रस्त निर्णय घेतल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडालेला असतानाच, आता राज्य सरकारने महत्वाचे निर्णय, मुद्दे बाजूला ठेवून दारू दुकानांच्या नावासंदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्यातील देशी दारुची दुकाने आणि बिअर बारला महापुरुष, देवी-देवता तसेच गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबत लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येणार आहे.

मंत्री बावनकुळे यांच्याकडून कार्यवाही
राज्यातील बिअर बार, दारुचे दुकाने आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच गडकिल्यांची नावे दिल्याचे दिसते, हा महापुरुषांचा अवमान असून राज्याच्या संस्कृतीला शोभणारे हे चित्र नाही, असा आक्षेप मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला होता. अमरसिंह पंडित यांच्या सूचनेनंतर उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील अधिकार्‍यांशी चर्चा केली. यानंतर कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत देशी दारुची दुकाने, बिअर बार आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच देवी-देवता आणि गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील उत्पादन शुल्क विभागालाही सूचना
राज्यातील उत्पादन शुल्क विभागालाही याबाबत परिपत्रक जारी करण्याची सूचना देण्यात आली आहे. राज्यातील बिअर बार, देशी दारुच्या दुकानांना उत्पादनशुल्क विभागाकडून परवाना दिला जातो. त्यामुळे त्यांनाही याबाबत परिपत्रक काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहापेक्षा अधिक कर्मचारी असणारी दुकाने, वाणिज्यिक आस्थापना, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे 24 तास सुरू ठेवण्यास मान्यता देणारे विधेयक मंजूर करण्यात आले होते. यासाठी कामगार कायद्यात सुधारित विधेयक मांडण्याचे काम सुरु आहे. याच विधेयकात या नियमाचाही समावेश होण्याची शक्यता आहे.