नवी दिल्ली : मद्यप्राशन करुन गाडी चालवणं तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. कारण वाहनचालकांची नशा उतरवणारा नवीन कायदा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या नव्या कायद्यानुसार आता मद्यप्राशन करुन वाहन चालवणार्या चालकांकडून पाचपट दंड वसूल केला जाणार आहे.
मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे. या सुधारित कायद्यानुसार मद्यपी वाहनचालकांकडून पाचपट जास्त दंड वसूल केला जाणार आहे. यानुसार दंडाची रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. या नव्या सुधारीत कायद्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणार्यांकडूनही मोठा दंड वसूल केला जाणार आहे. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर केला नसल्यास 2500 रुपये, वाहतुकीचे नियम तोडल्यास 1000 रुपये, सीट बेल्टचा वापर केला नसल्यास 1000 रुपये, वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 5000 रुपये इतका दंड वसूल केला जाईल.
भारतातील रस्त्यांवर दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात घडतात. तर दीड लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागतात. या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दिला होता. या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. आता लवकरच हे सुधारित विधेयक अंतिम मंजुरीसाठी संसदेत सादर केले जाईल. नवीन कायद्याला संसदेत मंजुरी मिळाल्यास मद्यप्राशन करुन गाडी चालवणार्या तळीरामांवर वचक निर्माण होणार आहे. मद्यप्राशन करुन गाडी चालवणार्या चालकांकडून पाच पट जास्त दंड आकारला जाईल. म्हणजेच आता या नियमाचे उल्लंघन करणार्या चालकांकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. याशिवाय मद्यधूंद वाहनचालकामुळे एखादाचा बळी केल्यास त्याच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. यात दोषी आढळल्यास त्या वाहनचालकाला 10 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासाठी गृहमंत्रालयाला भारतीय दंड विधानातील कलम 299 मध्ये सुधारणा करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.