दोघे अद्याप फरार : शिक्रापूर पोलिसांनी दहा तासात केली आरोपीला अटक
शिक्रापूर । दारू पिण्याच्या कारणावरून एका कामगाराचा तिघांनी खून केल्याची घटना 22 फेब्रुवारीला सायंकाळी शिक्रापुरात घडली होती. खून करणार्या एका आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी दहा तासात अटक केली आहे. घनशाम विद्यानाथ पटेल (वय 40) असे मृताचे नाव आहे. तर निजाम शेख असे अटक झालेल्याचे आहे. नागेंद्र राजभर, रवींद्र राजभर हे दोघे सख्खे भाऊ फरार आहेत.नागेंद्र राजभर, रवींद्र राजभर, निजाम शेख व घनशाम पटेल हे चार कामगार एकत्र राहत असून त्यांच्यामध्ये दारू पिण्यावरून किरकोळ भांडणे होत होती. 22 फेब्रुवारीलादेखील या चौघांमध्ये दारू पिण्यावरून भांडण झाले. यात रवींद्र याने तिघांना देखील तोंडात मारले. त्यामुळे घनशामने देखील रवींद्रला मारले. म्हणून रवींद्र, नागेंद्र व निजाम या तिघांनी मिळून घनशाम पटेलला मारहाण केली. रवींद्र याने घनशामचे डोके भिंतीवर आदळले. डोक्याला जबर मार लागल्याने घनशामचा मृत्यू झाला.
मारहाण करून तिघे फरार
या घटनेपासून नागेंद्र, रवींद्र, निजाम हे तिघे फरार होते. कामगारांचे सुपरवायझर राजेंद्र शेळके त्या ठिकाणी आले असता त्यांना घनशाम हा रक्तबंभाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्याचवेळी शेळके यांना रवींद्रने फोन केला. त्याने पटेल सोबत भांडण झाल्याने त्याला मारहाण केल्याचे सांगितले. तेव्हापासून आरोपींचा पोलिस शोध घेत होते. एकजण चाकण येथे गेला असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, प्रल्हाद सातपुते, विजय गाले यांनी चाकण येथे जाऊन माणिक चौक चाकण येथून निजाम उर्फ नजमुद्दीन शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता भांडणातून पटेलला मारहाण केल्याने तो मृत झाल्याचे कबूल केले.