यावल : शहरातील शिवाजीनगर भागात एकाला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने संशयीताने 33 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केला. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. संशयीताविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
चाकू हल्ल्याने उडाली खळबळ
शहरातील शिवाजीनगर भागात वासुदेव सुरेश पाटील (33) हे मुलगा ईश्वर (8) सह मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातून शहरात फळे घेण्यासाठी दुचाकीव्दारे निघाले असताना रेणुकामाता मंदिराच्या जवळ संशयीत आरोपी विलास उर्फ पिंटू सुखदेव सूर्यवंशी याने त्यांचा रस्ता अडवला. दारू पिण्यासाठी पैसे द्यावे, असे संशयीताने सांगितल्याने वासुदेव पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला व त्याचा राग येऊन विलास ऊर्फ पिंटू सूर्यवंशी याने आपल्याजवळील चाकूने पाटील यांच्या मानेवर वार केला व वार वाचवण्याचा प्रयत्नात त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला व मानेवर देखील गंभीर दुखापत झाली. हा प्रकार जवळच असलेल्या ज्ञानेश्वर पाटील व महेश जाधव यांनी पाहिला. जखमी व रक्तबंबाळ स्थितीत वासुदेव पाटील यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ.बी.बी.बारेला, डॉ.शुभम तिडके, अधिपरीचारीका मंजुषा कोळेकर, पिंटू बागुल यांनी उपचार केले. या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात आरोपी विलास ऊर्फ पिंटू सुखदेव सूर्यवंशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.