पायजमा देणार तहसीलदारांना भेट : …अन्यथा दारुने आंघोळ
शिरूर । शिरूर तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींनी दारुबंदीचे ठराव केले आहेत. तरीदेखील गेल्या अनेक दिवसांपासून येथे दारुची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. तालुक्यात संपुर्ण दारु बंदी करावी अशी मागणी येथे जोर धरत आहे. त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने 1 मार्चपासून क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. शासनाला नेहरू शर्ट अर्पण करून सविनय कायदे भंगाचे आंदोलन सुरू केले आहे. धनंजय गायकवाड, मंगेश खांडरे, बाबुराव पाचंगे, डॉ. संतोष पोटे, सागर दरेकर, अमित दरेकर, गणेश हरगुडे, विजय दरेकर, सुनिल हिंगे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
शिरूर तालुक्यात संपुर्ण दारूबंदीची कारवाई केली नाही तर 8 मार्चला अंगावरील पायजमा तहसीलदारांना भेट देणार आहे. तरीही कारवाईस टाळाटाळ केली तर 15 मार्चला तहसिलदारांच्या दालनात दारुने आंघोळ करण्याचा इशारा क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला.
शासकीय यंत्रणा जबाबदार
तालुक्यातील केंदुर व मांडवगण फराटा येथे महिलांनी मतदानातून उभी बाटली आडवी केली. तरीही तेथे दारुचा महापूर सुरू आहे. तसेच तालुक्यातील 93 पैकी 86 गावांमधे दारू दुकानांना परवानगी नाही. तरीही गावांमध्ये पाच ते दहा अवैध दारू दुकाने सुरू आहेत, असे पाचंगे यांनी यावेळी सांगितले. याला राज्य उत्पादन शुल्क व इतर शासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत उत्पादन शुल्क विभाग व वरीष्ठांशी पत्रव्यवहार करून बैठक घेणार असल्याचे तहसिलदार रणजीत भोसले यांनी सांगितले.