दाळ अपहार प्रकरणातील अटकपुर्व अर्ज फेटाळला

0

जळगाव । मुंबईच्या तिन दालमिल कंपनीच्या मालकांनी जळगाव येथील दालमिल व्यापार्‍याची आठ लाख 46 हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मात्र फरार असलेल्या दोघांपैकी एकाने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला असून न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.

संगनमताने चौघांनी परस्पर विकली दाळ
जळगाव एमआयडीसीतील व्यापारी राजेश ओमप्रकाश अग्रवाल यांनी आरोपी दलाल गोविंद वालजी भानुशाली आणि अमितकुमार गोविंद भानुशाली यांच्यामार्फत मुंबई असलेल्या अर्बुदा अ‍ॅग्रोला चना फिल्टर कोहीनुर ब्रॅण्डचे 670 कट्टे प्रत्येकी 30 किलोचे असे एकुण 8 लाख 46 हजार रूपये किंमतीचा माल 24 जानेवारी 2018 रोजी ट्रक क्र. एमएच 18 बीजी 3928 ने मुंबई रवाना केला. मात्र यातील आरोपी ठाणाराम भवरलाल पवार आणि महेश मेघजी भानुशाली दोन्ही रा.मुंबई यांच्या गोविंद वालजी भानुशाली आणि अमितकुमार गोविंद भानुशाली असे एकुण चौघांनी संगनमताने ट्रकमधील दाळची परस्पर विल्हेवाट लावून विक्री केली. याबाबत राजेश ओमप्रकाश अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अमित भानुशाली आणि ठाणाराम पवार यांना अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर दोघे फरार आरोपीपैकी गोविंद वालजी भानुशाली याने आज जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनसाठी अर्ज केला असता न्या.के.बी.अग्रवाल यांनी फेटाळून लावला.