महाळुंगे इंगळे : गुढीपाडवा सणासाठी माहेरी आलेल्या बावीस वर्षीय नवविवाहितेने बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार खराबवाडी नजीक दावडमळा (ता. खेड) मंगळवार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. मागील तीन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गिरीसोसावी व उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी दिली.
काजल सुनील झोडगे (वय 22 वर्ष, मूळ रा. पाबळ, ता. शिरूर, सध्या रा. दावडमळा (ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तिचे चुलते ज्ञानेश्वर महादेव गोरे (वय 46 वर्ष, रा. दावडमळा, ता. खेड) यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, काजल हिचे शिरूर तालुक्यातील पाबळ येथील सुनील ज्ञानेश्वर झोडगे याच्याबरोबर तीन महिन्यापूर्वी लग्न झाले होते. गुढीपाडवा सणानिमित्त तिचा भाऊ प्रितेश कैलास गोरे हा तिला माहेरी सोमवारी दावडमळा येथे घेऊन आला होता. मंगळवारी सकाळी तिने बेडरूममधील स्लॅबच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकण ग्रामीण रूग्णालयात तिच्या मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिस निरीक्षक संतोष गिरीसोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अर्चना दयाळ, पोलिस हवालदार राजेंद्र मोरे व त्यांचे अन्य सहकारी या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.