पिंपरी-चिंचवड : महापालिकेकडून आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना देण्यात येणारी भेटवस्तूची परंपरा खंडीत केली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणार्या आरोप-प्रत्यारोपांना आळाआहे. तसेच नेहमी खापर फोडल्या जाणार्या प्रशासनातील अधिकार्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 5 व 6 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यापैकी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आकुर्डीत एक दिवसाचा मुक्काम असतो. या वारीकाळात पिंपरी-चिंचवडकर वारकर्यांची सेवा करतात.
दरवर्षी पन्नास लाखांचा खर्च
जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीतील सहभागी दिंडीकरांना कित्येक वर्षापासून महापालिकेकडून विविध स्वरुपात भेटवस्तू देवून त्यांचा सन्मान करण्यात येत होता. महापालिकेत कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता असली, तरी देखील गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे. याकरिता पंचवीस ते पन्नास लाख रुपये खर्च केले जातात. यावेळी भाजपकडून वारीतील दिंड्यांना यंदा तंबु भेट देण्याच्या विचाराधिन असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले होते.
भेटवस्तूत भ्रष्टाचाराचे आरोप
मागील दोन वर्षापूर्वी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधक भाजपकडून करण्यात आला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या आरोपामूळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. त्यानंतर भाजपची सत्ता आल्यावर ताडपत्री भेट देण्यात आल्या. मग याच्याही खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत अधिकार्यांनाही धारेवर धरुन चौकशीला सामोरे जावे लागले.
यंदाची खरेदी नाही
दरम्यान, यंदा तंबू भेट देण्याचे पत्र महापौरांनी 20 जूनला आयुक्त श्रावण हर्डिकरांना दिले. तसेच वारकर्यांना कोणती वस्तू द्यायची यावर गटनेत्यांना विचारात घेवून निर्णय घेण्याचे म्हटले होते. परंतू, महापौरांनी दिलेले पत्र जनसंपर्क विभागाकडून भेटवस्तू खरेदीसाठी अद्याप भांडार विभागाकडे आलेले नाही. त्यामुळे भेटवस्तूची परंपरा यावर्षीपासून खंडीत होणार आहे. मात्र, यंदा शासनाच्या आदेशामुळे महापालिकेकडून कोणतीही भेटवस्तू देता येणार नाही, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.
-एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेता
भेटवस्तूवरुन पुन्हा वाद उद्भवू नये, आरोप-प्रत्यारोपांने आषाढी वारीला गालबोट लागू नये, म्हणून यंदा वारक-यांना पाणी, स्वच्छतागृह अशा विविध नागरी सुविधा मुबलक प्रमाणात पुरविण्याच्या येणार आहेत.