जळगाव। निंभोरा येथे मुलीच्या सोयरिक कामानिमित्त जात असलेल्या दिंडोरी येथील कृषी सहाय्यक अधिकार्याच्या कारला शिवकॉलनी जवळ मालट्रकला ओव्हरटेक करणार्या तवेरा गाडीने समोरून जोरदार धडक दिली. ही घटना शनिवारी सकाळी 10.20 वाजता घडली. यात कारच्या बोनट वाकून समोरील काच फुटून नुकसान झाले असून त्यात महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर पोलिसांनी वाहने ताब्यात घेतली असून कृषि सहाय्य अधिकार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तवेरा गाडीचारलकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
निंभोर्याला जात होते फालक कुटूंबिय नाशिक येथील सातपुर परिसरात सुनिल झिपरू फालक हे पत्नी भारती, मुलगी चारूलता आणि मुलगा हर्ष यांच्यासोबत राहतात. तर फालक हे दिंडोरी येथे कृषी खात्यात कृषि सहाय्यक अधिकारी या पदावर कार्यरत आहे. सुनिल फालक शनिवारी मुलीच्या सोयरिक कामानिमित्त कुटूंबियांसोबत कार (क्रं.एमएच.15.एफएफ.2492) ने जळगावातील निंभोरा येथे जाण्यासाठी नाशिकहून सकाळी 5 वाजता निघाले.
तवेराने समोरून दिली जोरदार धडक..
जळगावत दाखल झाल्यानंतर भुसावळकडे जात असतांना महामार्गावरील शिवकॉलनी स्टॉपजवळील हॉटेल लयभारीसमोर सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास धुळेकडे जाणारी तवेरा गाडी (क्रं.एमएच.43.ए.5312) ने मालट्रकला ओव्हरटेक करून कृषि सहाय्यक अधिकारी फालक यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. यात कारचे बोनट वाकले जावून काच फुटून नुकसान झाले. मात्र, फालक यांच्या पत्नी भारती यांना डोक्याला कारचे डॅशबोर्ड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दोन्ही वाहने पोलिसांनी घेतली ताब्यात
फालक यांनी लागलीच पत्नी भारती यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तर तवेरा चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने शेख बशीर शेख नशीर (वय-29 रा.पारपेठ मलकापूर जि.बुलढाणा) असे सांगितले. यानंतर सुनिल फालक यांनी लागलीच जिल्हा पेठ पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर कृषि सहाय्यक अधिकारी फालक यांनी कार घेवून जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठत तवेरा कारचालक शेख बशीर शेख नशीर याच्याविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार शेख बशीर याच्याविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तवेरा गाडीही ताब्यात घेतली आहे. यातच महिलेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.