नवी दिल्ली । भारतात पहिल्यांदाच होणार्या 17 वर्षाखालील गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतीय क्रीडा मंत्रालयाने दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना, रोनाल्डो आणि रोनाल्डीन्होला आमंत्रित केले आहे. क्रीडा मंत्रालयाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि फुटबॉल खेळाची जागतिक संघटना फिफाच्या माध्यमातून या तिघा फुटबॉलपटूंना आंमत्रण पाठवले आहे.
एक तासाचा कार्यक्रम
क्रीडा मंत्रालयाच्या अधिकार्याने सांगितले की, उद्घाटन समारंभ एक तासाचा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला मार्गदर्शन करतील. त्यानंतर फिफाचे प्रमुख जियानी इंफेटिंनो, क्रीडामंत्री विजय गोयल, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रमुख प्रफुल्ल पटेल सगळ्यांना संबोधित करतील.
6 ते 28 ऑक्टोबरदरम्यान भारतात होणार्या स्पर्धेचे उद्घाटन 5 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. याआधी उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये होणार होता. क्रीडा मंत्रालयाच्या अधिकार्यांनी सांगितले की, फुटबॉल खेळातील या महान खेळाडूंना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.